शिवसेना विरुद्ध शिवसेना संघर्षात निलम कदम यांच्या पदोन्नतीचा बळी जाणार?
उल्हासनगर: नीतू विश्वकर्मा
उल्हासनगर महानगरपालिकेतील शिक्षण मंडळात लेखा लिपिक पद अस्तित्वात नसताना सुद्धा निलम कदम यांची शिक्षण मंडळात लेखा लिपिक पदावर नियुक्ती करण्यात आली.त्यावेळी निलम कदम यांच्या नियुक्तीचा मोठ्या प्रमाणात विरोध झाला,त्यानंतर शिक्षण मंडळातील गैरकारभारा विरुद्ध देखील निलम कदम यांच्यावर मोठ्या प्रमाणात आरोप झाले.एकंदरीतच निलम कदम यांची शिक्षण मंडळाच्या लेखा लिपिक पदावरील नियुक्ती वादग्रस्त ठरली असताना आता त्यांची महानगरपालिकेने उप लेखाधिकारी पदावर केलेली पदोन्नती देखील अडचणीत सापडली आहे.
उल्हासनगर महानगरपालिका शिक्षण मंडळाच्या लेखा अधिकारी निलम कदम यांनी महानगरपालिकेला लेखापाल पदासाठी पदोन्नती मागितली असताना उल्हासनगर महापालिकेने त्यांना उपलेखा अधिकारी पदावर बढती दिली.त्यानंतर आता राजकारण तापायला सुरुवात झाली आहे.महापालिका प्रशासनाने निलम कदम यांना उप लेखाधिकारी पदावर बडती दिल्यामुळे बाळासाहेबांची शिवसेना या पक्षातून निलम कदम यांच्या पदोन्नतीचा विरोध सुरू झाला असून बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे माजी नगरसेवक भुल्लर महाराज यांनी उल्हासनगर महानगरपालिकेच्या या निर्णयावर आक्षेप घेतला आहे.
उप लेखाधिकारी पदावर पदोन्नती मिळालेल्या निलम कदम ह्या शिवसेनेत एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडखोरीनंतर नव्याने स्थापन झालेल्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटाचे कल्याण जिल्हा प्रमुख चंद्रकांत बोडारे यांच्या कन्या असून उल्हासनगर महानगरपालिकेचे माजी नगरसेवक,सभागृह नेते तथा विद्यमान शिवसेना कल्याण जिल्हा समन्वयक धनंजय बोडारे यांच्या पुतणी असल्याने शिवसेनेत निर्माण झालेल्या दोन गटातील संघर्षाच्या परिणामामुळेच केवळ निलम कदम यांच्या उप लेखाधिकारी पदावरील पदोन्नतीचा विरोध केला जात असल्याची शहरात चर्चा आहे.