शालेय गणवेश सक्ती करणाऱ्या संस्थेविरोधात कारवाई करण्यात यावी- म न वि से
उल्हासनगर म न वि से आज उल्हासनगर मनपा सरकारी शाळांमध्ये गणवेश, पुस्तके यांचे मोफत वाटप होत असताना, खासगी इंग्रजी शाळांमार्फत मात्र पालकांना गणवेश, पुस्तके, वह्या ठराविक दुकानांमधूनच खरेदी करण्याची सक्ती केली जात आहे. खासगी इंग्रजी माध्यमाच्या शाळांमार्फत हे प्रकार अधिक प्रमाणात होत असून, शालेय गणवेशाची खरेदी शाळेतूनच करण्याबाबतच पालकांवर सक्ती केली जात आहे. नर्सरीपासून दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांच्या पालकांना शाळांचा हा जाच सहन करावा लागत आहे. शहरातील विविध दुकानांशी संगनमत करून शाळा या माध्यमातून कमिशन मिळवत असल्याचा आरोपही काही पालकांतर्फे केला जातोय. काही शाळा तर गणवेश, स्पोर्टस ड्रेस यांची विक्री शाळांमध्येच करीत असून, बाहेर हजार-बाराशे रुपयांना मिळणारे ड्रेस दोन अडीच हजारांना विकले जात असल्याची माहिती काही पालकांनी दिली.
खाजगी शिक्षण संस्था चालकांना त्यांच्याच शाळेतून विद्यार्थ्यासाठी लागणारी वह्या पुस्तके, गणवेश इ. साहित्य खरेदीची पालकांना सक्ती करता येत नाही. तशी त्यांनी केल्यास त्यांच्यावर शिक्षणाधिकाऱ्यांनी तात्काळ संबंधित संस्थाचालकांविरुद्ध गुन्हे दाखल करावे, असे निर्देश आहेत. या निर्देशांचे आपण पालन करावे.
शालेय गणवेश सक्ती करणाऱ्या संस्थेविरोधात कारवाई करण्यात यावी या करिता आज प्रशासन अधिकारी,उपायुक्त शिक्षण विभाग यांना अँड.कल्पेश माने यांच्या वतीने पत्र देण्यात आले,यावेळेस मनसे जिल्हा सचिव संजय घुगे,मनसे शहर अध्यक्ष बंडू देशमुख,विभाग अध्यक्ष सागर चौहान, मनविसे पदाधिकारी तन्मेश देशमुख उपस्थित होते.