उल्हासनगरमध्ये डॉक्टरांची माफियागँग मॅक्सलाईफ हॉस्पिटलच्या काळयाबाजाराचा पर्दाफाश.
उल्हासनगर : नीतू विश्वकर्मा
उल्हासनगर :- कायदेशीर संरक्षणाचा फायदा घेत काही डॉक्टर रुग्णांना लुटतात याचा प्रत्यय उल्हासनगरमधील त्रिलोकानी परिवाराला आला. येथील मॅक्सलाईफ हॉस्पिटलमध्ये १० लाखाच्या कोटेशननुसार ८ लाख ५० हजार रुपये रोख रक्कम देवून १० लाखांचा मेडीक्लेम पास झाल्यानंतरही डिस्चार्ज देताना २१ लाखांचे बोगस बिल हातात देत रुग्णाला नाडण्याचा प्रकार नुकताच घडला. दिलेली रोख रक्कम मेडीक्लेम पास झाल्यावर देण्याचे हॉस्पिटलच्या डॉ. महेश मुळे यांनी कबूल केले असताना रक्कम परत देताना डॉक्टरांनी रक्कम परत देणे टाळले. हॉस्पिटलचा हा सर्व बनाव रुग्णाच्या नातेवाईकांनी पोलिसांच्या निदर्शनात आणून दिला तरीही पोलिसांनी बघ्याची भूमिका घेतली आहे. याप्रकरणी आता भाजप आमदार कुमार आयलानी हे येत्या पावसाळी अधिवेशनात हॉस्पिटलची मान्यता रद्द करण्याची व डॉ महेश मुळे यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी करणार असल्याचे भाजप अनुसूचित जाती मोर्चा अध्यक्ष कपिल आडसुळ यांनी प्रसिध्दी माध्यमांना सांगितले आहे. वेळप्रसंगी हॉस्पिटलच्या विरोधात तीव्र आंदोलन करण्यात येईल असेही ते म्हणाले आहेत.