सेंच्युरी कंपनीची औद्योगिक सुरक्षा वाऱ्यावर; याला औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालय विभागाचा ढिसाळ कारभार जबाबदार?.
उल्हासनगर : नीतू विश्वकर्मा
उल्हासनगर शहाड परिसरात असलेल्या सेंच्युरी कंपनीतील सीएस 2 डिपार्टमेंटमध्ये जोरदार ब्लास्ट होऊन या घटनेत अनेक कामगार जखमी झाले असून दोन कामगारांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे.शनिवारी २३ सप्टेंबर रोजी सकाळी ११.३० वाजताच्या सुमारास कंपनीमध्ये एमएच 04 जिसी 2482 या टँकर मध्ये सीएस2 (कार्बन डाय सल्फर) हे रसायन भरता वेळी हा स्फोट झाला असून या स्फोटात मृत्यूमुखी पडलेल्या कामगारांचा जरी आकडा कंपनीने जाहीर केला आहे. परंतु अद्यापही बेपत्ता असलेल्या कामगारांमुळे या अपघातात अनेक कामगार मृत्यूमुखी पडल्याची शक्यता नाकारता येत नाही.या घटनेनंतर सेंच्युरी कंपनीवर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून कंपनीत कामगारांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर असल्याचे दिसून येत आहे.
अंदाजे ५ ते ६ हजार कामगार असलेल्या या कंपनीत कामगारांबाबत आतापर्यंत अनेक अनपेक्षित घटना घडल्या असल्याने यात मोठ्या प्रमाणावर कामगारांचे जीव गेले आहेत.दिनांक – २३ सप्टेंबर रोजीची घटना पाहता याअगोदर ही कंपनीत अपघाताच्या घटना घडल्या आहेत.१६ फेब्रुवारी २०१८ रोजी सेंच्युरी कंपनीत संजय शर्मा या एका कामगाराचा पाइपलाइनमधून गळती झालेल्या विषारी वायूचा श्वास घेतल्याने मृत्यू झाला होता तर अन्य ११ जणांना रुग्णालयात दाखल करावे लागले होते.सेंच्युरी रेयॉनच्या कंपनीत कामगारांचे पथक पाईपलाईन दुरुस्त करत असताना ही घटना घडली होती.तसेच १४ एप्रिल २०२२ रोजी देखील सेंच्युरी कंपनीत एका कामगारचा प्लान्टमध्ये पडून मृत्यू झाल्याची घटना घडली होती.अनिलकुमार झा असे मयत कर्मचाऱ्याचे नाव होते.झा हे प्लान्टमध्ये पडलेले पाहताच कंपीच्या सुरक्षा रक्षकाने पोलिस आणि अग्नीशमन दलाला याची माहिती दिली.अग्नीशमन दलाने तात्काळ त्यांना बाहेर काढत मध्यवर्ती रुग्णालयात नेले.मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
यावरून आपल्या असे लक्षात येईल की, सेंच्युरी कंपनीत कामगारांच्या सुरक्षिततेबाबत पुरेशी दक्षता घेण्यात येत नसल्यामुळे आणि यावर नियंत्रण ठेवण्यासाठी कार्यरत असलेली शासनाची प्रशासकीय यंत्रणा औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालय या विभागाच्या ढिसाळ कारभारामुळे सेंच्युरी कंपनीची औद्योगिक सुरक्षा वाऱ्यावर असल्याचे दिसून येत आहे.कारखान्यातील अपघातांची चौकशी करणे आणि प्रतिबंधात्मक उपाययोजना सुचविणे ही जबाबदारी औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालय विभागाची असताना सेंच्युरी कंपनीत आतापर्यंत घडलेल्या अनेको अपघातात या विभागाने सखोल चौकशी करून त्यावर प्रतिबंधात्मक उपाययोजना सुचवले नसल्यामुळे सेंच्युरी कंपनीत अशाप्रकारे अपघात घडवून येत आहेत.औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालय (पूर्वीचे कारखाने निरिक्षक) ही महाराष्ट्र शासनाची प्रशासकीय यंत्रणा असून तिचा उद्देश कारखाने अधिनियम, 1948, महाराष्ट्र कारखाने नियम, 1963 व त्याअंतर्गत तयार केलेले नियम यांची अंमलबजावणी करणे व कारखान्यात काम करीत असलेल्या कामगारांच्या सुरक्षा, आरोग्य व कल्याणाची खात्री हा आहे.त्याचप्रमाणे कामगारांचे कामकाजाचे तास, कामाच्या जागेची परिस्थिती, अपघातांची आणि धोकादायक घटनांची संख्या कमी करणे, सुरक्षा, आरोग्य व कल्याण याबाबत कामगारांच्या तक्रारींवर राज्य व केंद्र सरकारने तयार केलेल्या धोरण व कार्यक्रमानुसार उपाययोजना करण्याची जबाबदारी या विभागावर आहे.
यावाढत्या कारखानदारी सोबतच वेळोवेळी कारखाने अधिनियम, 1948 व महाराष्ट्र कारखाने नियम, 1963 मध्ये दुरुस्ती करण्यात आली असून आता या विभागास धोकादायक रसायनांचे उत्पादन साठवण व आयात नियम,1989, रासायनिक अपघात (आपत्कालीन नियोजन, सुसज्जता व प्रतिसाद) नियम,1996 व महाराष्ट्र कारखाने (अतिधोकादायक कारखान्यांचे नियंत्रण) नियम,2003 च्या तरतुदींची अंमलबजावणी करण्याची जबाबदारीसुध्दा देण्यात आलेली आहे.मात्र, या विभागात अत्यंत तोकडी कर्मचारीसंख्या असल्याने औद्योगिक कामगारांची सुरक्षा हा विभाग कसा साधणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे. गेल्या काही वर्षांत कारखान्यांची संख्या वाढलेली असून, त्यात अपघात होण्याचे प्रमाण वाढलेले आहे. त्यामुळे या विभागावर मोठी जबाबदारी असतानाही सरकारचे या विभागाकडे दुर्लक्ष झाल्याचे स्पष्ट होत आहे.त्यामुळे या कारखान्यातील कामगारांचे प्रश्न त्यांची सुरक्षा करण्याची जबाबदारी असलेले कार्यालयाल मात्र अधिकारी व कर्मचारी कमी असल्यामुळे कामगारांचे प्रश्न व सुरक्षा कशी सुटेल हा कळीचा मुद्दा आहे.
आपल्या वैयक्तिक जीवनाप्रमाणेच उद्योग क्षेत्रात काम करणार्या अथवा या क्षेत्राशी संबंधित प्रत्येकासाठीच आपली व कामाच्या ठिकाणची सुरक्षितता सर्वोपरी महत्त्वाची असते.उद्योगातील महत्त्वाच्या अशा ‘औद्योगिक सुरक्षितता’ या विषयाला विशेष चालना देण्यासाठी आपल्याकडे दरवर्षी दि. ४ ते ११ मार्च या कालावधीत ‘औद्योगिक सुरक्षा सप्ताह’ पाळला जातो.मात्र तरीही औद्योगिक सुरक्षिततेचा प्रश्न सुटण्याऐवजी अधिकच गंभीर होत चालला असून औद्योगिक सुरक्षिततेबाबत हवी तेवढी दक्षता घेतली जात नसल्यामुळे सेंच्युरी कंपनीतील औद्योगिक सुरक्षेच्या समस्येप्रमाणे हा औद्योगिक सुरक्षेचा प्रश्न अधिक उग्र रूप धारण करित असून त्याला औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालय विभागाचा ढिसाळ कारभारच सर्वस्वी जबाबदार आहे.