Ambernath Shiv Temple: काशी विश्वनाथ मंदिराच्या धर्तीवर अंबरनाथ शिव मंदिर परिसराचा होणार विकास.
अंबरनाथ : नीतू विश्वकर्मा
अंबरनाथ येथील शिलाहारकालीन शिवमंदिर (Ambernath Ancient Shiv Temple/Shiv Mandir) परिसर सुशोभीकरण प्रकल्प उभारणीचा लवकरच श्री गणेश होणार आहे. एक हजार वर्षांपूर्वीच्या प्राचीन कलाश्रीमंत संस्कृतीचा ठळक पुरावा असलेले हे उत्कृष्ट वास्तुवैभव सुशोभिकरण प्रकल्पामुळे नव्याने उजळून निघणार आहे. या प्रकल्पाच्या १०७ कोटी रुपयांच्या प्रत्यक्ष कामाला आता सुरुवात होणार आहे. या प्रकल्पांतर्गत मंदिराच्या मूळ संरचनेला कुठेही धक्का न लावता नव्याने अनेक वास्तूंची उभारणी करण्यात येणार आहे. यामुळे प्राचीन शिवमंदिर परिसराचा चेहरा मोहरा बदलणार आहे. काशी विश्वनाथ मंदिर (Kashi-Vishwanath) परिसर विकास प्रकल्पाच्या धर्तीवर या मंदिर परिसराचा विकास करण्यात येणार असून अंबरनाथचे हे प्राचीन शिवमंदिर महाराष्ट्रातील एक उत्तम धार्मिक पर्यटन स्थळ म्हणून विकसित होईल, असा विश्वास कल्याण लोकसभा चे खासदार डॉक्टर श्रीकांत एकनाथ शिंदे (Doctor Shrikant Eknath Shinde) नी व्यक्त केला.