उल्हासनगर प्लॅटफॉर्म क्रमांक २ ची उंची वाढवण्याची मागणी, अपघात टाळण्यासाठी नागरिकांची कारवाईची तयारी.





उल्हासनगर : नीतू विश्वकर्मा
उल्हासनगर पूर्व रेल्वे स्थानकातील प्लॅटफॉर्म क्रमांक २ आणि लोकल ट्रेन यामध्ये उंचीचा (height) मोठा फरक असल्याने प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. विशेषतः महिला आणि वयोवृद्ध प्रवाशांना लोकलमध्ये चढताना अडचणी येतात. गर्दीच्या वेळी ही समस्या अधिक गंभीर होत असून, अनेकांना गाडीत चढणे अशक्य होते. तसेच, यामुळे अपघात होण्याची शक्यताही नाकारता येत नाही.
प्रवाशांना होणाऱ्या त्रासावर तोडगा काढण्यासाठी ॲड. प्रशांत चंदनशिव यांनी उल्हासनगर रेल्वे स्थानकाच्या व्यवस्थापकांना निवेदन सादर केले आहे. निवेदनात प्लॅटफॉर्म क्रमांक २ ची उंची वाढवण्याची तातडीने मागणी करण्यात आली आहे. जर १० दिवसांच्या आत उपाययोजना करण्यात आल्या नाहीत, तर उपोषण करण्याचा इशाराही देण्यात आला आहे.
या मागणीला पाठिंबा देण्यासाठी समाजसेवक अनिल मराठे, रवी वर्मा, आणि यश शिंदे यांनीही सहभाग नोंदवला आहे. या विषयावर विभागीय रेल्वे व्यवस्थापकांना ईमेलद्वारे विनंती पाठवण्यात आली असून, ट्विटरवरही ही समस्या मांडण्यात आली आहे.
सदर विषयाकडे रेल्वे प्रशासनाने तातडीने लक्ष द्यावे, अशी नागरिक आणि सामाजिक कार्यकर्त्यांची मागणी आहे, जेणेकरून प्रवाशांना होणारा त्रास आणि संभाव्य अपघात टाळता येईल.