DombivliheadlineHeadline TodaypoliticsSocial

फ्रेंडशिप डे स्पेशल : डोंबिवलीत प्रथमच होणार फ्रेंडशिप रन २०२४,तब्बल १०,००० डोंबिवलीकरांची आरोग्यदायी मैत्रीची “धाव”.

 

डोंबिवली : नीतू विश्वकर्मा 

दरवर्षी ऑगस्ट महिन्याचा पहिला दिवस संपूर्ण जगभरात फ्रेंडशिप डे (मैत्री दिन) म्हणून साजरा केला जातो. याच फ्रेंडशिप डे च्या निमित्ताने यंदा डोंबिवलीमध्ये 4 ऑगस्ट रोजी प्रथमच “डोंबिवलीकर फ्रेंडशिप रन 2024 चे आयोजन करण्यात आले आहे. सार्वजनिक बांधकाममंत्री रविंद्र चव्हाण यांच्या माध्यमातून आणि डोंबिवलीकर एक सांस्कृतिक परिवार तसेच कल्याण डोंबिवली रनर ग्रुपच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम साजरा केला जाणार आहे. 

चालणे, धावणे किंवा पळणे हे प्रकार निरोगी आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली समजले जातात. धकाधकीच्या शहरी वातावरणात आपल्या शरीराला व्यायाम अत्यावश्यक आहेच असं आरोग्यविज्ञान सांगते आणि त्यासाठी चालणे, धावणे किंवा पळणे यापेक्षा उत्तम काहीच नाही आणि हाच मूलमंत्र रुजवण्यासाठी रविंद्र चव्हाण आणि कल्याण डोंबिवली रनर्सच्या पुढाकाराने हा उपक्रम राबवण्यात येत असल्याची माहिती आयोजक रविंद्र चव्हाण यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.

“डोंबिवलीकर फ्रेंडशिप रन २०२४” ही स्पर्धा २१ किमी, १० किमी, ५ किमी  आणि १.६ किमीचा फन रन (fun run) या चार विभागात होणार आहे.

१.६ किमी चा फन रन हे या कार्यक्रमाचं आकर्षण असणार आहे जेथे ६ वर्षांपासून ते वृद्धांपर्यंत सर्वांचा सहभाग असेल. नामदार रविंद्र चव्हाण आणि कल्याण डोंबिवली रनर ग्रुप तर्फे शाळा, कॉलेज, सामाजिक संस्था इत्यादींनी जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन  करण्यात येत आहे. या मध्ये सहभाग घेतलेल्या प्रत्येक नागरिकांसाठी हा एक अविस्मरणीय अनुभव ठरावा यासाठी कल्याण डोंबिवली रनर ग्रुप प्रयत्नशील असल्याचे यावेळी डॉ. श्रेयस पळसकर यांनी सांगितले. कल्याण डोंबिवली रनर ग्रुप ही ५०० मॅरॅथॉनर्स असलेली संस्था गेली ९ वर्ष डोंबिवली कल्याणमध्ये धावण्याची संस्कृती रुजावी आणि वाढीस लागावी यासाठी प्रेरणादायी कार्य करत आहे.

तर डोंबिवली हे संस्कृतीक शहर तर आहेच पण या शहरातील जास्तीत जास्त नागरिकांना तंदुरुस्त बनविण्यासाठी असे उपक्रम आवश्यक असल्याचे मत नामदार रविंद्र चव्हाण यांनी व्यक्त केले. दिवाळी पहाट आणि गुढी पाडवा स्वागत यात्रा यांसारख्या आकर्षक कार्यक्रमांसाठी ओळखले जाणारे हे शहर आता डोंबिवलीकर फ्रेंडशिप रनच्या माध्यमातून पण ओळखले जावे यासाठी हा आमचा पहिलाच प्रयत्न असून त्याद्वारे डोंबिवली फिटनेस उपक्रमांचे केंद्रही बनेल याची आम्ही आशा बाळगून असल्याचे चव्हाण म्हणाले.





Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Verified by MonsterInsights