२७ गावात क्लस्टर योजना राबवणार; पाण्याचाही दिलासा- मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे यंत्रणांना आदेश.

मुंबई : नीतू विश्वकर्मा
कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रातील २७ गावांतील धोकादायक तसेच अनधिकृत बांधकामांचे सर्वेक्षण करून त्यांच्यासाठी क्लस्टर योजना राबवावी. त्यासाठी आराखडा तयार करावा. यामुळे गावांचा विकास होण्यास गती मिळेल, अशा सूचना राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कल्याण डोंबिवली महापालिका आयुक्तांना केल्या आहेत. तसेच वाढत्या लोकसंख्येला पुरेल इतके पाणी पुरवण्यासाठी अमृत योजनेचे स्वरूप अधिक विस्तारित करण्यासाठी अतिरिक्त २०० कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी द्यावी अशी मागणी कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी केली. त्यावरही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सकारात्मक भूमिका घेतली.
कल्याण डोंबिवली महापालिकेसह कल्याण लोकसभा मतदारसंघातील विविध विषयांवर तोडगा काढण्यासाठी शुक्रवारी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या प्रयत्नांने राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली एका विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत पाणी प्रश्नासह विविध महत्वाच्या विषयांवर चर्चा करण्यात आली. कल्याण डोंबिवली महापालिकेच्या अखत्यारीत मोठ्या प्रमाणात बांधकामे होत असून पाण्याची गरज देखील वाढू लागली आहे. यामुळे या शहरांना अतिरिक्त पाण्याची गरज आहे. त्यामुळे बारवी धरणातून किमान ८० ते ८५ एमएलडी अतिरिक्त पाणी देण्यात यावे. सूर्या धरणाचे काम पूर्णत्वास गेल्यानंतर त्यातून देखील काही अतिरिक्त पाणी साठा उपलब्ध करून देण्यात यावा. कुशिवली आणि काळू धरणाच्या उभारणीला गती देण्यात यावी. पोशिर धरणाचे काम देखील जलदगतीने पूर्णत्वास न्यावे. यामुळे केवळ कल्याण डोंबिवली महापालिकाच नव्हे तर अंबरनाथ, उल्हासनगर, बदलापूर आणि आसपासच्या शहरांचा पाणी पुरवठ्याचा प्रश्न कायमचा निकाली लागेल आणि नागरिकांना मोठा दिलासा मिळेल, अशी मागणी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी यावेळी केली. तर पोशिर धरणाचे काम एमएमआरडीएच्या माध्यमातून करण्यात आल्यास अधिक गतीने होईल, अशा सूचना देखील यावेळी केल्या.