कल्याण लोकसभा मतदार संघातील यंत्रणा मतमोजणीसाठी सज्ज !
कल्याण: नीतू विश्वकर्मा
24-कल्याण लोकसभा मतदार संघातील यंत्रणा मतमोजणीसाठी सज्ज असल्याची माहिती 24-कल्याण लोकसभा मतदार संघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी सुषमा सातपुते यांनी दिली आहे. दि. 20 मे 2024 रोजी संपन्न झालेल्या मतदान प्रक्रियेच्या 24-कल्याण लोकसभा मतदार संघातील मतमोजणीस डोंबिवली पूर्वेतील वै.ह.भ.प.सावळाराम महाराज म्हात्रे क्रीडा संकुलातील कै.सुरेंद्र वाजपेयी बंदीस्त क्रीडागृहात दि. 04 जून 2024 रोजी सकाळी 8 पासून प्रारंभ होणार आहे.
या मतमोजणीसाठी अधिकारी व कर्मचारी वर्गाचे पहिले प्रशिक्षण शिबीर दि. 28 मे 2024 रोजी डोंबिवली (पूर्व) येथील सावित्रीबाई फुले कलामंदिरात संपन्न झाले. आता मतमोजणीसाठी नियुक्त अधिकारी व कर्मचारी यांचे दुसरे प्रशिक्षण शिबीर (रंगीत तालीम) दि. 03 जून 2024 रोजी सकाळी 06.00 वाजता डोंबिवली पूर्वेतील वै.ह.भ.प.सावळाराम महाराज म्हात्रे क्रीडा संकुलातील कै.सुरेंद्र वाजपेयी बंदीस्त क्रीडागृहात ठेवण्यात आले आहे.
मतमोजणीच्या दिवशी मतमोजणी केंद्रात प्रती विधानसभा मतदार संघात १४ याप्रमाणे एकूण ८४ टेबल्सवर मतमोजणी करण्यात येणार असून, मतदानाच्या एकूण २९ फे-या होणार आहेत. या मतमोजणी कामी एकूण ६०० अधिकारी व कर्मचारी (पोलीस स्टाफ वगळून) वर्गाची नियुक्ती करण्यात आली आहे.