ठाणे जिल्ह्यातील मोबाईल स्कूल उपक्रमातील, मुलांचा शाळा प्रवेशपत्रे देण्याचा कार्यक्रम उत्साहात.
ठाणे- नीतू विश्वकर्मा
रस्त्यावरील बालकांना समाजाच्या मुख्यप्रवाहात आणण्यासाठी महिला व बाल विकास विभागाने नाविन्यपूर्ण योजनेतंर्गत फिरते-पथक (मोबाईल स्कूल) ही संकल्पना राबविली होती. या प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्यात नवी मुंबई व अंबरनाथ नगरपरिषदेच्या कार्यक्षेत्रातील ४७० बालकांना यंदाच्या सन 2024-25 या शैक्षणिक वर्षात महापालिकेच्या शाळेमध्ये प्रवेश देण्याचा कार्यक्रम आज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन भवन सभागृहात मोठ्या उत्साहात संपन्न झाला. यावेळी सन 2023-24 या वर्षात 10 वी, 12 वी उत्तीर्ण झालेल्या बालगृहातील 50 मुलांचा सत्कारही यावेळी करण्यात आला.
यावेळी महिला व बालविकास विभागाच्या कोकण विभागीय उपायुक्त सुवर्णा पवार, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी महेंद्र गायकवाड, जिल्हा परिषदेचे समाज कल्याण अधिकारी संजय बागूल, बाल विकास प्रकल्प अधिकारी विवेक चौधरी, बालसंरक्षण अधिकारी रामकृष्ण रेड्डी, बाल विकास प्रकल्प अधिकारी अजय फोडळ, बाल कल्याण समिती सदस्य स्वाती रणदिवे, माजी बाल हक्क आयोग सदस्य विजय जाधव आदी उपस्थित होते.
रस्त्यावरील बालकांसाठी महिला व बाल विकास विभागाने नाविन्यपूर्ण योजनेतंर्गत सन 2022-2023 या शैक्षणिक वर्षात फिरतेपथक (मोबाईल स्कूल) ही संकल्पना ठाणे जिल्ह्यासह राज्यातील 7 जिल्ह्यांमध्ये पायलट प्रोजेक्ट म्हणून राबविण्यात येत आहे. ठाणे जिल्ह्यामध्ये 1 फेब्रुवारी 2023 ते ऑगस्ट 2023 पर्यंत हा कार्यक्रम अतिशय यशस्वीरित्या राबविण्यात आला आहे. साधारणतः 170 रस्त्यावरील बालकांना सन 2023-2024 या शैक्षणिक वर्षामध्ये ठाणे व भिवंडी महानगरपालिकेच्या शाळांमध्ये प्रवेश मिळवून देण्यात आले होते.
या प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्यात नवी मुंबई महानगरपालिका व अंबरनाथ नगरपरिषद यांच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या रस्त्यावरील बालकांबरोबर महिला व बालविकास विभागाच्या ठाणे कार्यालयाने गेले 6 ते 7 महिने काम करुन बालकांमध्ये व त्यांच्या पालकांमध्ये शिक्षणाची गोडी वाढविली आहे. सदर बालकांना शाळेमध्ये प्रवेश द्यावा व त्यांचे शिक्षण व्यवस्थित व्हावे, यासाठी बालकांचे समुपदेशन करण्यात आले आहे. या सर्वांना परिपाक म्हणून साधारणतः यावर्षी सन 2024 – 2025 च्या शैक्षणिक वर्षामध्ये रस्त्यावर राहणारी व शाळेत न जाणारी 470 बालके विविध महानगरपालिकेच्या शाळांमध्ये दाखल झाले आहेत. या बालकांना शाळेच्या प्रवेशाची पत्रे व शालेय साहित्याचे प्रातिनिधीक स्वरुपात काही मुलांना वाटप करण्यात आले.
श्रीमती पवार म्हणाल्या की, माणूस हा शिक्षणातून घडत असतो. जो शिकतो तो बलवान होतो. शिक्षण हा मूलभूत हक्क आहे. वंचित घटकांची शिक्षण ही जेवढी जबाबदारी शासनाची आहे तेवढी समाज घटकांची सुद्धा आहे. आपल्या आजूबाजूला शिक्षणापासून कोणी वंचित राहणार यांची आपण काळजी घेतली पाहिजे. शिक्षण घेऊन आपण सक्षम झाले पाहिजे. आपण मानवाच्या हक्कासाठी काम केले पाहिजे. इतरांच्या हितासाठी काम केले पाहिजे.
यावेळी श्री.गायकवाड म्हणाले की, शाळाबाह्य बालकांमधील 10 विद्यार्थी या वर्षी इयत्ता दहावीच्या परीक्षेला बसले होते व 12 वीच्या परीक्षेला 8 विद्यार्थी बसले होते. हे सर्व विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहे. ठाणे जिल्ह्यात शिक्षणापासून कोणी वंचित राहणार यांची काळजी आम्ही घेणार आहोत.