…तर तुम्हाला शिवसेना स्टाईल उत्तर दिले जाईल – कल्याण शहर शिवसनेचा महावितरणला इशारा.
कल्याण : नीतू विश्वकर्मा
ग्राहकांच्या विविध प्रश्नांसंदर्भात कल्याण शहर शिवसेनेनं शनिवारी महावितरण अधिकाऱ्यांची भेट घेतली. या प्रश्नांबाबत तातडीने उपाय योजना न केल्यास शिवसेनास्टाईल उत्तर दिले जाईल असा सज्जड दम कल्याण शहर शिवसेनेतर्फे महावितरणला देण्यात आला. यावेळी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांसह कल्याणातील व्यापाऱ्यांचे शिष्टमंडळही यावेळी उपस्थित होते.
गेल्या काही महिन्यांपासून कल्याण पश्चिमेतील घरगुती ग्राहक असो की व्यावसायिक या दोघांनाही विविध समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. ज्यामध्ये वाढीव बिले, पूर्वसूचना न देता खंडीत होणारी वीज जोडणी आणि महावितरण अधिकारी – कर्मचाऱ्यांकडून दिली जाणारी वागणूक हे अतिशय गंभीर प्रश्न असल्याचे शहरप्रमुख रवी पाटील यांनी सांगितले. तसेच महावितरणकडून या सर्व प्रश्नांची दखल घेऊन ते सोडवले गेले नाही तर आता आम्ही शांतपणे आपल्याशी चर्चा करत आहोत. मात्र पुढच्यावेळी आपल्या कार्यालयातील फर्निचर शिल्लक राहणार नाही, आम्हाला ती भूमिका घेण्यास भाग पाडू नका अशा शब्दांत शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी महावितरण अधिकाऱ्यांना धारेवर धरले.
दरम्यान शिवसेनेने यावेळी सांगितलेल्या सर्व प्रश्नांवर योग्य ती कार्यवाही करण्याचे आश्वासन यावेळी महावितरण अधिकाऱ्यांकडून देण्यात आले.
यावेळी शहरप्रमुख रवी पाटील यांच्यासह कल्याण शहर व्यापारी फेडरेशनचे (नियोजित) अध्यक्ष हरीश खंडेलवाल हेदेखील उपस्थित होते. त्यांनीही कल्याणातील व्यावसायिक वीज ग्राहकांना येणाऱ्या वाढीव वीज बिलाच्या समस्येसह इतर समस्यांचा महावितरण अधिकाऱ्यांसमोर पाढा वाचला. तसेच महावितरणने वेळीच या समस्या न सोडवल्यास दुकानं बंद करण्याशिवाय आमच्यासमोर कोणताही पर्याय राहणार नसल्याची उद्विग्नताही त्यांनी सर्व व्यापाऱ्यांच्या वतीने मांडली.
यावेळी शिवसेना उपनेत्या सौ.विजयाताई पोटे,महिला कल्याण जिल्हा संघटक सौ.छायाताई वाघमारे,उपजिल्हाप्रमुख सौ.नितूताई कोटक,शहर संघटक सौ.नेत्राताई उगले,उपशहर संघटक सौ.उज्वलताई मलबरी,उपशहर प्रमुख नितीन माने,विभाग प्रमुख अंकुश केणे,भाऊ व्यवहारे,संजोग गायकवाड,रमन तरे,उपविभागप्रमुख रमेश पाटील,शाखाप्रमुख चेतन म्हामूणकर,अजय लिंगसे,रोशन चौधरी आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.