वालधुनी नदीचे संवर्धन करा आणि आगरी कोळी आर्थिक विकास महामंडळ स्थापन करा – आमदार विश्वनाथ भोईर यांच्या अधिवेशनात मागण्या,राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनातील चर्चेत सहभाग.
कल्याण : नीतू विश्वकर्मा
गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या वालधुनी नदीचे संवर्धन करण्यासोबतच आगरी कोळी समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आगरी कोळी आर्थिक विकास महामंडळाची स्थापना करण्याच्या दोन प्रमुख मागण्या कल्याण पश्चिमेचे आमदार विश्वनाथ भोईर यांनी केल्या आहेत. राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सध्या सुरू असून महायुती सरकारने सादर केलेल्या अर्थसंकल्पाबाबत राज्य शासनाचे कौतुक करत आमदार विश्वनाथ भोईर यांनी या दोन प्रमुख मागण्या केल्या आहेत.
आगरी कोळी समाजाला मुख्य प्रवाहात आणणे गरजेचे…
ठाणे, रायगड आणि मुंबई परिसरात पूर्वीपासूनच मोठ्या संख्येने आगरी कोळी समाजाचे वास्तव्य आहे. गेल्या अनेक वर्षांमध्ये विविध विकासकामे आणि विकास प्रकल्पासाठी शासनाकडून त्यांच्या जमिनी अधिग्रहित करण्यात आल्या आहेत. मात्र या जमिनींअभावी आगरी कोळी समाजासमोर उत्पन्नाच्या साधनाचा प्रश्न निर्माण झाला आहे. ही वस्तुस्थिती पाहता इतर सामाजिक महामंडळांच्या धर्तीवर आगरी कोळी समाजासाठी आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्याची मागणी आमदार विश्वनाथ भोईर यांनी यावेळी केली आहे. तसेच या मंडळाच्या माध्यमातून विद्यार्थी, महिला, वैद्यकीय, अभियांत्रिकी, कृषी आदी व्यावसायिक योजना आखून त्यासाठी अर्थसहाय्य करण्याची आग्रही भूमिका आमदार भोईर यांनी मांडली आहे.
वालधुनी नदीचे संवर्धन करण्याचा पुनरुच्चार…
कल्याण शहराच्या मध्यभागातून जाणाऱ्या वालधुनी नदीला आज अक्षरशः नाल्याचे रुप प्राप्त झालं आहे. एकीकडे ड्रेनेजचे तर दुसरीकडे रासायनिक कारखान्यांमधून सोडण्यात येणाऱ्या घाणेरड्या पाण्यामुळे वालधुनी नदीची अवस्था बिकट झाली आहे. परिणामी गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या वालधुनी नदी संवर्धन प्रक्रियेसाठी अर्थसंकल्पात तरतूद करण्याची मागणीही आमदार विश्वनाथ भोईर यांनी यावेळी मांडली. तसेच वालधुनी नदीतील गाळ काढून ती स्वच्छ करावी. तिचे खोलीकरण केल्यास या नदीच्या काठावर असलेल्या घोलप नगर, भवानी नगर, योगिधाम आदी मोठमोठ्या गृहसंकुलांना पावसाळ्यात पुराचा वेढा पडणार नाही आणि दिलासा मिळेल असे आमदार भोईर यांनी यावेळी सभागृहात सांगितले. तसेच या नदीच्या संवर्धनासाठी अर्थसंकल्पात तरतूद करण्याची आग्रही मागणीही त्यांनी यावेळी केली.