‘त्या’ महिलेचा जीव वाचवणाऱ्या वाहतूक पोलिसांचा शिवसेनेकडून सत्कार, कल्याणच्या गांधारी गणेशघाट परिसरात घडली होती घटना.
कल्याण : नीतू विश्वकर्मा
निर्माल्य टाकण्याच्या निमित्ताने गांधारी नदीकिनारी गेलेल्या आणि नंतर नदीमध्ये वाहून जाणाऱ्या महिलेचा जीव दोघा वाहतूक पोलिसांनी वाचवल्याची घटना काल घडली होती. य दोन्ही वाहतूक पोलिसांचे सर्वच स्तरांतून कौतुक होत असून या महिलेचा जीव वाचवल्याबद्दल कल्याण शहर शिवसेनेतर्फेही त्यांचा सत्कार करण्यात आला. शिवसेना शहरप्रमुख रवी पाटील यांच्यासह प्रमुख पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.
कल्याण पश्चिमेतील गांधारी परिसरात काल दुपारी हा प्रकार घडला. कल्याण शहर वाहतूक शाखेचे पोलिस मच्छिंद्र चव्हाण आणि ट्रॅफिक वॉर्डन संजय जैस्वार अशी या दोघा कर्मचाऱ्यांची नावे आहेत. गांधारीजवळील एका मोठ्या गृहनिर्माण सोसायटीत राहणारी ही वयोवृध्द महिला काल सकाळी गांधारी नदी परिसरातील गणेश घाटाजवळ निर्माल्य टाकण्यासाठी आली होती. मात्र काही वेळाने ही महिला याठिकाणी दिसत नसल्याचे एका नागरिकाला आढळले. मुसळधार पावसामुळे गांधारी नदीचे पात्रही गणेश घाट सोडून पुढपर्यंत आले होते. त्यामुळे या नागरिकाने त्वरित त्याठिकाणी असलेल्या वाहतूक पोलिस चौकीत जाऊन मच्छिंद्र चव्हाण यांना ही माहिती दिली.
त्यावर मच्छिंद्र चव्हाण आणि वॉर्डन जेस्वार यांनी गणेश घाट किनाऱ्याच्या दिशेने धाव घेत महिलेच्या शोधासाठी पाण्यामध्ये उतरले. त्यावेळी हाताने पाण्यात चाचपत असताना चव्हाण यांच्या हाताला या महिलेची साडी लागली. ती पकडुन त्यांनीं खेचण्याचा प्रयत्न असता तिचा हात त्यांच्या हाताला लागला. तो पकडुन दोघांनीही महिलेला बाहेर खेचण्याचा प्रयत्न केला. परंतु ती नदीच्या गाळामध्ये रुतल्याने संपूर्ण ताकदीनिशी दोघांनीही तिला पाण्याबाहेर काढले. आणि क्षणाचाही विलंब न करत तिला जवळील रूग्णालयात दाखल केल्याने या वयोवृध्द महिलेचा जीव वाचू शकला.
वाहतूक पोलीस मच्छिंद्र चव्हाण आणि वॉर्डन जैस्वार यांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून दाखवलेल्या या प्रसंगावधानामुळे या महिलेचा जीव वाचू शकला. त्याबद्दल शिवसेना कल्याण शहर प्रमुख रवी पाटील, उपनेत्या विजया पोटे, केडीएमसीचे माजी सभागृह नेते श्रेयस समेळ, माजी नगरसेवक अरविंद पोटे, शाखाप्रमुख रोहन कोट, उपविभाग प्रमुख कुणाल कुलकर्णी, सुनिल वाघ, चैतन्य महाडीक आदी पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत या दोन्ही पोलिसांचा सन्मान करण्यात आला.