कल्याण स्टेशन परिसर: सॅटिस प्रकल्प पूर्ण होईपर्यंत प्रशासकीय यंत्रणांनी नियमित कारवाई सुरु ठेवा – शिवसेना शहरप्रमुख रवी पाटील
कल्याण : नीतू विश्वकर्मा
कल्याण रेल्वे स्टेशन आणि शहर परिसरातील वाहतूक कोंडी आणि प्रशासकीय नाकर्तेपणाचा मुद्दा चांगलाच ऐरणीवर आला आहे. या पार्श्वभूमीवर कल्याण स्टेशन परिसरात जोपर्यंत सॅटिस चे काम सुरू आहे तोपर्यंत महापालिका, पोलीस आणि रेल्वे प्रशासनाने एकत्रितपणे कारवाई सुरूच ठेवण्याची आग्रही मागणी शिवसेना कल्याण शहर प्रमुख रवी पाटील यांनी केली आहे.
कल्याण शहर आणि विशेषता स्टेशन परिसरातील वाहतूक कोंडीच्या प्रश्नांसंदर्भात रवी पाटील यांनी रिक्षा युनियनचे नेते प्रणव पेणकर आणि प्रतीक पेणकर यांच्यासह आज केडीएमसी आयुक्त डॉक्टर इंदूराणी जाखड यांची भेट घेतली. त्यावेळी स्टेशन परिसरातील वाहतूक कोंडी सोडवण्याच्या मागणीसह त्यासाठी आवश्यक उपाययोजनाही यावेळी सुचवल्या.
कल्याण डोंबिवली महापालिका, आरटीओ, वाहतूक पोलीस, शहर पोलीस, ट्राफिक वॉर्डन, रेल्वे पोलीस आणि रेल्वे प्रशासन या सर्व प्रशासकीय यंत्रणांनी एकत्रित मिळून स्टेशन परिसरात काम केले पाहिजे. स्मार्ट सिटीच्या सॅटिस प्रकल्पाचे काम स्टेशन परिसरात सुरू आहे त्याचा परिणाम रिक्षाचालकांच्या व्यवसायावर झाला असून स्टेशन परिसरात असणाऱ्या रेल्वेच्या मोकळ्या जागांवर रिक्षा उभ्या करण्याची परवानगी देण्यात यावी,रेल्वे स्टेशन परिसरात आरटीओ अधिकाऱ्यांनी रिक्षा चालकांच्या कागदपत्रांची तपासणी करून अनधिकृत रिक्षा तसेच पंधरा वर्षावरील रिक्षा पकडून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी,
रेल्वे स्थानक परिसरात रस्त्यावर असलेल्या अनधिकृत टपऱ्या, फेरीवाले, त्यासोबतच फुटपाथवर असलेले अतिक्रमण तात्काळ काढून टाकून या जागा मोकळ्या कराव्यात,त्यासोबतच स्कायवॉकवर असणारे फेरीवाले आणि देहविक्रीय करणाऱ्या महिला यांच्यामुळे प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागतो. या स्कायवॉकवरील फेरीवाले आणि देहविक्रीय करणाऱ्या महिलांचा तातडीने बंदोबस्त केला जावा, अशा मागणी वजा सूचना यावेळी या बैठकीत आपण केल्याची माहिती शिवसेना कल्याण शहरप्रमुख रवी पाटील यांनी प्रसिद्धी माध्यमांना दिली.
त्यावर केडीएमसी आयुक्तांनी या सर्व सूचना लवकरच अंमलात आणल्या जातील असे आश्वासन दिल्याचेही पाटील यांनी सांगितले.
या बैठकीला केडीएमसी आयुक्त डॉ. इंदूराणी जाखड यांच्यासह वाहतूक विभागाचे डीसीपी डॉ. विनय राठोड झोन 3 चे डीसीपी सचिन गुंजाळ, स्मार्ट सिटीचे प्रमुख अधिकारी प्रल्हाद रोडे आदी प्रमुख अधिकारी वर्ग उपस्थित होता.