अभिमानास्पद कामगिरी : NPCIL च्या ट्रेनिंगमध्ये कल्याणच्या युवकाचा पहिला क्रमांक.
कल्याण : नीतू विश्वकर्मा
कल्याणकरांसाठी एक अतिशय अभिमानास्पद अशी बाब आहे. न्युक्लीयर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया अर्थातच NPCIL या भारत सरकारच्या सार्वजनिक उपक्रमाच्या परिक्षेमध्ये कल्याणातील देवेश संजय लाळगे या युवकाने पहिला क्रमांक पटकावला आहे. न्युक्लीयर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया अर्थातच NPCIL ही अणूउर्जेपासून वीज निर्मिती करणारा केंद्र सरकारचा सार्वजनिक उपक्रम आहे. देवेशने मिळवलेल्या या यशाबद्दल केडीएमसीचे माजी सभागृह नेते श्रेयस समेळ यांनी त्याची भेट घेत अभिनंदन केले.
कल्याणातील संतोषी माता रोड परिसरात राहणाऱ्या देवेशचे वडील हे कुमुद विद्यामंदिर शाळेमध्ये लॅब असिस्टंट म्हणून काम करतात तर त्याची आई गृहिणी आहे. शालेय जीवनापासूनच देवेश अतिशय हुशार असून मोहिंदर सिंग काबल सिंग शाळेतून तब्बल 94 टक्के गुणांनी दहावी उत्तीर्ण झाला आहे. त्यानंतर मुलुंड येथील वझे कॉलेजमधून त्याने बारावीच्या परीक्षेत (सायन्स )88.13 टक्के गुण मिळवले. तर बारावीनंतर त्याला सीईटीच्या गुणवत्तेवर ऐरोली येथील मेघे कॉलेजमध्ये केमिकल इंजिनिअरिंगला प्रवेश मिळाला. आणि त्याच्या शेवटच्या वर्षात कॉलेज प्लेसमेंटमध्येही तो निवडला गेला.
मात्र आपल्याला पब्लिक सेक्टर युनिट (PSU) मध्ये काम करायची इच्छा असल्याने आपण 2022 मध्ये केमिकल इंजिनिअरिंगमध्ये गेट परीक्षा दिली. परंतु त्यावेळी संपूर्ण भारतात आपला 1 हजार 276 वा रँक आल्याने कोणत्याच पब्लिक सेक्टर युनिट (PSU) मधून इंटरव्ह्यूसाठी मला कॉल आला नसल्याचे देवेशने सांगितले.
मात्र त्यामुळे हार ना मानता देवेशने आणखी जोमाने अभ्यास करत 2023 मध्ये पुन्हा एकदा गेट परीक्षा दिली. आणि त्यामध्ये संपूर्ण देशभरात 136 वा क्रमांक मिळवत आपल्या स्वप्नपूर्तीच्या दिशेला जाणाऱ्या मार्गाचे दरवाजे खुले केले. या स्पर्धेतील यशानंतर त्याला केंद्र सरकारच्या न्युक्लीयर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया अर्थातच NPCIL या सार्वजनिक उपक्रमातून मुलाखतीसाठी बोलावले गेले. आणि त्यातही देवेशने यश मिळवत NPCIL मध्ये एक्झीक्यूटिव्ह ट्रेनी म्हणून गुजरात येथे त्याची निवड झाली.
त्यातही नंतर एक वर्षाने या प्रशिक्षणाच्या घेण्यात आलेल्या परीक्षेत तर देवेशने अक्षरशः इतिहास रचला. त्यामुळे देवेशची सायंटिफिक ऑफिसर म्हणून NPCIL च्या मुख्यालयात म्हणजेच मुंबईत नियुक्ती झाली आहे.
देवेशने मिळवलेल्या या यशाबद्दल त्याचे सर्वच स्तरातून कौतुक होत असून माजी सभागृह नेते श्रेयस समेळ यांनीही घरी जाऊन त्याचे अभिनंदन केले.