Breaking NewsheadlineHeadline TodaykalyanKalyan Breaking News

कल्याणातील वाहतूक कोंडी : नागरिक, प्रसिध्दी माध्यम आणि लोकप्रतिनिधींच्या रेट्यानंतर अखेर केडीएमसी प्रशासन झाले जागे

कल्याण  : नीतू विश्वकर्मा

कल्याण शहर आणि स्टेशन परिसरातील वाहतूक कोंडीच्या गंभीर प्रश्नांबाबत मुके,बहिरे आणि आंधळेपणाची भूमिका घेतलेल्या केडीएमसी प्रशासनाला अखेर जाग आली आहे. शहरातील नागरिकांकडून झालेला उद्धार, प्रसिध्दी माध्यमांकडून झालेली चौफेर टीका आणि लोकप्रतिनिधी तसेच राजकीय पदाधिकाऱ्यांच्या रेट्यानंतर केडीएमसी प्रशासनाला या प्रश्नांचा साक्षात्कार झाला आहे. केडीएमसी आयुक्त डॉ. इंदु राणी जाखड यांनी काल शहर पोलीस, वाहतूक पोलीस, रेल्वे प्रशासन आणि स्मार्ट सिटी अधिकाऱ्यांची बैठक घेत संबंधित अधिकाऱ्यांना कार्यवाही करण्याचे आदेश दिले आहेत. मात्र केडीएमसीसह संबंधित प्रशासकीय यंत्रणा या आदेशाची कितपत अंमलबजावणी करते की त्याला केराची टोपली दाखवते हे पाहावे लागणार  आहे.

गेल्या दोन आठवड्यांपासून कल्याण शहर परिसर असो की स्टेशन परिसर असो, या दोन्ही ठिकाणी प्रचंड अशी वाहतूक कोंडी होत आहे. ज्याचा फटका सर्वसामान्य करदाते नागरिकांसह शालेय विद्यार्थी आणि रुग्णवाहिकेतून जाणाऱ्या रुग्णांना बसत आहे. शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न इतका गंभीर झाला की तो हाताबाहेर गेला असा वाटण्याइतकी भयानक परिस्थिती निर्माण झाली होती. मात्र गेंड्याच्या कातडीच्या प्रशासनाला आणि त्यातील मस्तवाल अधिकारी वर्गाला जणू त्याच्याशी काही देणेघेणेच नाहीये. अशा आविर्भावात केडीएमसीसह इतर प्रशासनातील हे सर्व अधिकारी मूग गिळून गप्प बसले होते. जनाची नाही पण किमान मनाची तरी थोडी फार लज्जा बाळगून आणि ज्या करदात्या नागरिकांमुळे दर महिन्याला आपला पगार होतो, याची तरी किंचितशी जाण त्यांनी ठेवायला पाहिजे होती. मात्र संपूर्ण शहराला वाऱ्यावर सोडून ही प्रशासकीय यंत्रणा आपल्याच धुंदीत मग्न झाली होती.

आणि मग शहरातील नागरिकांनी सोशल मीडियावर या प्रशासनाच्या निष्काळजीपणाबाबत ‘म आणि भ’ च्या भाषेत यथेच्छ उद्धार सुरू केला, प्रसिध्दी माध्यमांची चौफेर टीका सुरू झाली आणि लोकप्रतिनिधी, राजकीय पदाधिकाऱ्यांनीही रेटा लावल्यानंतर हे कुंभकर्णी प्रशासन खडबडून जागे झाले. आणि काल सर्व प्रशासकीय यंत्रणेची बैठक लावत शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडवण्यासाठी त्यांनी काही आदेश काढले.

प्रशासनाने हे आदेश काढले असले तरी त्यांची अंमलबजावणी कशी आणि किती दिवस होणार हा खरा प्रश्न आहे. की नेहमीप्रमाणे पुढील काही दिवस हा कारवाईचा फार्स चालणार. आणि त्यानंतर पुन्हा ये रे माझ्या मागल्या अशीच परिस्थिती निर्माण होईल याची उत्तरं लवकरच मिळतील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Verified by MonsterInsights
What do you like about this page?

0 / 400