Breaking NewsheadlineHeadline TodaykalyanKalyan Breaking News

संतापजनक : खड्ड्यांपाठोपाठ त्यातून उडणाऱ्या धुळीमुळे श्वसनाच्या आजारांनी नागरिक बेजार.

कल्याण  : नीतू विश्वकर्मा

गेल्या काही महिन्यांपासून केडीएमसी प्रशासनाच्या  भोंगळ कारभाराची अक्षरशः हद्दच झाली आहे. एकीकडे नागरी समस्या दिवसागणिक उग्र रूप धारण करत असताना केडीएमसी प्रशासन मात्र बघ्याच्याच भूमिकेत असल्याचे दिसत आहे. कारण आधीच रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांमुळे नागरिकांचे कंबरडे मोडले असताना त्याच खड्ड्यांमधून उडणाऱ्या धुळीमुळे होणाऱ्या श्वसनाच्या आजारांनी नागरिक बेजार झाले आहेत.

आधी मुसळधार पावसाने केडीएमसीच्या तथाकथित नालेसफाईची पोलखोल केल्यानंतर शहरातील जवळपास सर्वच अंतर्गत रस्त्यांवर खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे. त्यातून वाट काढता काढता नागरिकांच्या पाठीची आणि कांबरेचीच वाट लागली आहे. रस्त्यांवरील या खड्ड्यांमुळे अनेक वाहनचालकांना पाठदुखीचा त्रास सुरू झाला आहे.

मात्र हा त्रासही कमी म्हणून की काय त्यामध्ये आता श्वसनाच्या आजारांचीही भर पडली आहे. लहान मुले आणि ज्येष्ठ नागररिकांना या खड्ड्यातील धुळीचा सर्वाधिक त्रास होत असून श्वसनाचे विविध आजार होऊ लागले आहेत. विशेष म्हणजे शहरातील डांबरी किंवा सिमेंट काँक्रीटचा असा एकही रस्ता नाहीये ज्यावर धुळीचे साम्राज्य पसरलेले नाहीये. प्रत्येक रस्त्यावर या धुळीचे थरच्या थर साचले असून केडीएमसी प्रशासनाला मात्र त्याकडे बघण्याकडे अजिबातच वेळ नाहीये.

गेल्या काही महिन्यांपासून शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न असो, फेरीवाल्यांचा प्रश्न असो, मोठमोठ्या होर्डिंग्जचा प्रश्न असो की पावसाळ्यातील नालेसफाई आणि रस्त्यांवरील खड्ड्यांचा केडीएमसी प्रशासन या नागरी समस्या सोडवण्यात सपशेल अप्याशी ठरल्याचेच एकंदर परिस्थितीवरून दिसत आहे. केडीएमसी प्रशासनाच्या या नियोजनशून्य आणि ढिसाळ कारभारामुळे नागरी समस्या उग्र रूप धारण करत असून येत्या काळात कल्याणकर नागरिकांची अवस्था आगीतून फुफाट्यात अशी होण्याची भिती सामान्य नागरिक व्यक्त करत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Verified by MonsterInsights