कल्याण शहर शिवसेनेची सामाजिक संवेदना जपणारी दहीहंडी,सामाजिक उपक्रमांसोबत यंदा अनोख्या रील स्पर्धेचे आयोजन.
कल्याण : नीतू विश्वकर्मा
सामाजिक भान जपून आपली संस्कृती परंपरा कायम राखणारा दहीहंडी उत्सव अशी शिवसेना कल्याण शहर शाखेच्या दहीहंडी उत्सवाची ओळख आहे. यंदाच्या दहीहंडीचे हे 16 वे वर्ष असून यंदाही त्याचे भव्य स्तरावर आयोजन करण्यात आल्याची माहिती शहर प्रमूख रवी पाटील यांनी प्रसिध्दी माध्यमांना दिली. तसेच सामाजिक उपक्रमासोबतच यावर्षी युवा वर्गासाठी अनोखी रिल स्पर्धा हे यंदाच्या उत्सवाचे आकर्षण असणार आहे.
दहीहंडी हा महाराष्ट्रातील एक प्रमुख उत्सव असून गेल्या दोन दशकांपासून त्याला अतिशय भव्य स्वरुपात त्याचे साजरीकरण केले जात आहे. उद्या सोमवारी 26 ऑगस्ट रोजी श्रीकृष्ण जयंती असून मंगळवारी 27 ऑगस्ट रोजी गोपाळकाला उत्सव होणार आहे. शिवसेना शहर शाखेची दहीहंडी ही कल्याणातील प्रमूख दहीहंडी उत्सवापैकी एक समजला जातो. याठिकाणी आपली सांस्कृतिक परंपरासोबतच सामाजिक भानही जपण्यात येते. दरवर्षी आयोजित करण्यात येणाऱ्या या दहीहंडी उत्सवातून अनावश्यक खर्च टाळून समाजातील गरजू व्यक्तींना, देशासाठी लढताना वीरमरण आलेल्या सैनिकांच्या कुटुंबाला, नैसर्गिक आपत्तीग्रस्त गावकऱ्यांना आर्थिक मदत करण्यात आली आहे. यावर्षी अपघातात निधन झालेल्या साईभक्तांच्या मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी शिवसेना शहर शाखेतर्फे उचलण्यात आल्याची माहिती यावेळी शहरप्रमूख रवी पाटील यांनी दिली.
तर दहीहंडी उत्सवात सहभागी होणाऱ्या युवकांचा विचार करता यंदा प्रथमच अनोख्या मोबाईल रिल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. यासाठी शिवसेना शहर शाखेच्या दहीहंडी उत्सवाचे मोबाईल चित्रीकरण करून ज्या स्पर्धकाच्या रिलला सोशल मीडियावर लाइक्स, कमेंट आणि व्ह्यू सारखी अधिक पसंती मिळेल त्यांना रोख बक्षिसे देण्यात येणार आहेत. या स्पर्धेसाठी नियुक्त जजेसकडून सहभागी स्पर्धकांच्या रिल्सचे कॅमेरा अँगल, क्रिएटीव्हीटी आदी प्रमुख घटकांचा विचारही केला जाणार आहे. या रिल स्पर्धेतील प्रथम विजेत्याला 25 हजार, द्वितीय विजेत्याला 15 हजार आणि तृतीय विजेत्याला 11 हजार रुपयांचे बक्षीस देण्यात येणार असल्याची माहिती शहरप्रमूख पाटील यांनी दिली आहे.
यावेळी शहरप्रमूख रवी पाटील यांच्यासह उपशहरप्रमुख सुनील खारूक,नितिन माने,नरेंद्र कामत, दुर्योधन पाटील, विनोद गायकवाड, विभागप्रमुख भाऊ व्यवहारे,मधू सातवे,उपविभागप्रमुख कुणाल कुलकर्णी, शाखाप्रमुख संतोष घोलप,सागर जाधव,उपशाखा प्रमुख गणेश वेदापठक,युवासेना सहसचिव प्रतिक पेणकर, भिवंडी लोकसभा विस्तारक सूचेत डामरे उपस्थित होते.