केडीएमसी क्षेत्रातील सर्वंकष विकासकामांबाबत खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांची मॅरॅथॉन बैठक.
कल्याण : नीतू विश्वकर्मा
केडीएमसी क्षेत्रात सुरू असलेल्या सर्वंकष विकासकामांबाबत आणि महापालिका क्षेत्रात सुरू असलेल्या पायाभूत सुविधांच्या प्रकल्पांबाबात कल्याण लोकसभेचे खा. डॉ. श्रीकांत शिंदे यांनी आज मॅरेथॉन बैठक घेतली. कल्याण डोंबिवली महानगरपालिका मुख्यालयात झालेल्या या बैठकीमध्ये खा. डॉ.शिंदे यांनी
विकासकामांची गती वाढवण्याचे निर्देशही उपस्थित अधिकाऱ्यांना दिले.
लोकसभा निवडणुकीपूर्वी कल्याण डोंबिवलीतील विविध विकास प्रकल्पांबाबत खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी बैठक घेतली होती. त्यानंतर लोकसभा निवडणुकीनंतर आज ही मॅरेथॉन आढावा बैठक संपन्न झाली. ज्यामध्ये 27 गावांतील अमृत योजना, ‘एमएमआरडीए’च्या माध्यमातून सुरू असणारी रस्त्यांची कामे, गटारांची कामे, नगरसेवकांच्या प्रभागातील विकासकामे, महापालिका शाळांचे सुशोभीकरण आणि अद्ययावतीकरण, स्मशानभूमिंचे अद्ययावतीकरण, शहरातील उद्याने आणि तलावांचे पुनरुज्जीवन – विकास आदी महत्त्वाच्या विषयांवर या बैठकीत चर्चा करण्यात आल्याचे खा. डॉ. श्रीकांत शिंदे यांनी सांगितले.
त्यासोबतच नामांकित केपीएमजी ही संस्था पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या धर्तीवर शहरामध्ये स्मार्ट ट्रॅफिक मॅनेजमेंट, स्मार्ट पार्किंग, स्मार्ट टॉयलेट्स आणि ॲड स्पेस डेव्हलपमेंटचे काम करणार आहे. विशेष म्हणजे महापालिकेला या संस्थेला यासाठी एक रुपयाही द्यावा लागणार नाही असेही त्यांनी यावेळी सांगितले.
तर कल्याण पूर्वमध्ये 100 फुटी रस्ता परिसरात असलेल्या 8 एकर जागेवर स्टेडियम उभारण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. यासाठी 60 टक्के भूसंपादन झाले असून डोंबिवलीतील वै.संत श्री सावळाराम महाराज क्रिडा संकुलाच्या धर्तीवर हे स्टेडियम उभारण्याचा मानस असल्याचे सांगत याचसोबत डोंबिवलितील खंबाळ पाडा , कल्याण पश्चिमेतील बारावे येथे अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज असे स्पोर्ट्स स्टेडियम उभारण्याबाबतचे प्रेझेंटेशनही आजच्या बैठकीत करण्यात आल्याचे खा.डॉ. श्रीकांत शिंदे यांनी सांगितले. तर मेट्रो 12 चे काम पूर्णपणे गतीने सुरू असल्याचे सांगत सावळाराम क्रिडा संकुल जुने झाल्याने त्याचा पुनर्विकास आणि अद्ययावतीकरण करण्याचा निर्णय झाल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. या कामासाठी एमआयडीसीकडून 50 कोटी रुपयांचा निधी प्राप्त होणार आहे.
कल्याण मेट्रो डीपीआरचे कामही आता पूर्ण झाले असून त्यालाही लवकरच मंजुरी मिळेल आणि पूर्ण कल्याण पश्चिम मेट्रो मार्गाने जोडले जाईल असे मत खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी यावेळी व्यक्त केले.