कल्याणातील नागरी समस्या सोडवा अन्यथा शिवसेना स्टाईल आंदोलन छेडू – श्रेयस समेळ यांचा केडीएमसी प्रशासनाला इशारा

कल्याण : नीतू विश्वकर्मा
कल्याण पश्चिमेतील वाहतूक कोंडी, रस्त्यांवरील खड्डे, स्वच्छता, फेरीवाले,अनधिकृत होर्डिंग्ज आदी नागरी समस्या दिवसेंदिवस उग्र रूप धारण करत आहेत. या सर्व समस्यांची तातडीने दखल घेऊन नागरिकांना दिलासा द्यावा. अन्यथा शिवसेना स्टाईल उग्र आंदोलन छेडण्याचा इशारा माजी सभागृह नेते श्रेयस समेळ यांनी दिला आहे. या विविध नागरी प्रश्नांसंदर्भात समेळ यांनी सोमवारी केडीएमसी आयुक्त डॉ.इंदू राणी जाखड यांची भेट घेतली.
यावेळी समेळ यांच्यासमवेत माजी नगरसेवक विद्याधर भोईर आणि शाखाप्रमूख संतोष घोलप हेदेखील उपस्थित होते.
आगामी सणासुदीच्या काळात स्टेशन परिसर, छत्रपती शिवाजी महाराज चौक, स्वामी सहजानंद चौक, दक्षिण मुखी मारुती मंदिर चौक, जुने कल्याण, संतोषी माता रोड रामबाग परिसर येथे भयानक परिस्थीती निर्माण होण्याची शक्यता आहे, तर ६० रुपये कोटी खर्चुन बनविण्यात येणाऱ्या स्मार्ट रोडला अनधिकृत फेरीवाले, फूड स्टॉल, टपऱ्या, गणपती कारखाने, दुकाने, गॅरेज यांनी विळखा घातला आहे, कल्याणात सर्वच ठिकाणी रस्त्यांवर प्रचंड खड्डे पडलेले असून त्यामुळे नागरिकांना पाठीचे, कंबरेचे व मानेच्या आजारांसोबतच त्यातून उडणाऱ्या धुळीमुळे श्वसनाचे त्रासही सुरु झाले आहेत, भगवा तलाव (काळा तलाव) येथे स्वच्छतेचा अभाव तसेच शौचालयामुळे पसरणाऱ्या दुर्गंधीने नागरिक त्रस्त झाले आहेत. या समस्यांसोबतच महापालिका क्षेत्रातील अनधिकृत होर्डिंग्जचा प्रश्न उपस्थित करत या सर्व समस्या केडीएमसी प्रशासनाने तातडीने सोडवण्याची मागणी माजी सभागृह नेते श्रेयस समेळ यांनी केली आहे.
तसेच कल्याण शहरात कुठेही पब्लिक टॉयलेट्सची सुविधा उपलब्ध नाहीये. त्यामुळे ज्येष्ठ नागरिक, गर्भवती महिला आणि लहान मुलांची मोठी कुचंबणा होत आहे. परिणामी शहरातील मुख्य भागांमध्ये हे पब्लिक टॉयलेट्स उभारण्याची मागणी त्यांनी केली आहे. शहरातील अनेक नागरिकांकडे आज कुत्रा,मांजरी यासारखे पाळीव प्राणी असून त्यांची संख्या ही मोठी आहे. या पाळीव प्राण्यांसाठी स्मशानभूमी किंवा दफनभूमी नसल्याने होणारी गैरसोयही समेळ यांनी केडीएमसी प्रशासनाच्या निदर्शनास आणून देत मानवतेच्या दृष्टिकोनातून ही सुविधा उपलब्ध करण्यासाठीही केडीएमसी प्रशासनाला साकडे घातले आहे.
दरम्यान या सर्व नागरी समस्या आणि प्रश्नांची तातडीने दखल घेऊन आवश्यक कार्यवाही न केल्यास शिवसेना स्टाईल आंदोलन छेडणयाचा इशारा दिला आहे.