श्रावण स्पेशल : कल्याणच्या जय मल्हार कॅफेमध्ये सुरू झालाय अनोखा “श्रावण महोत्सव”

कल्याण : नीतू विश्वकर्मा
केळाच्या पानावर वाढलेली आळूची आंबट गोड भाजी, वालाचे चटकदार बिरडे, उकडलेल्या बटाट्याची चविष्ट भाजी – पोळी, कुरकुरीत कोथिंबीर वडी, काकडीची कोशिंबीर, पंचामृत, मसाले भात – मठ्ठा. यासोबतच खमंग अशी पुरणाची पोळी, गुळाच्या सारणापासून बनवलेले उकडीचे मोदक आणि त्यावर साजूक तुपाची मस्त अशी धार. आणि हेही कमी म्हणून की काय तर या सुग्रास पंचपक्वान्नाच्या जेवणासोबतच मंद आवाजातील आशाताईंची सुमधुर अशी मराठी भावगीते.
काय मग? या अस्सल मराठमोळ्या पारंपरिक पदार्थांची नावे वाचूनच, तुमच्या तोंडाला पाणी सुटलं असेल ना…नुकत्याच सुरू झालेल्या श्रावण महिन्याच्या निमित्ताने कल्याणच्या मुरबाड रोडवरील जय मल्हार कॅफेमध्ये आजपासून श्रावण महोत्सव सुरू झाला आहे. या कॅफेच्या प्रमूख नयना समर घोलप यांच्या संकल्पनेतून श्रावण महोत्सवात या अस्सल मराठमोळ्या रुचकर जेवणाची ही थाळी उपलब्ध करून देण्यात आली आहे.
गेल्या दोन वर्षांपासून जय मल्हार किचनमध्ये हा श्रावण महोत्सव साजरा होत असून त्याला दर्दी खवय्यांचा वाढता प्रतिसाद मिळत आहे. त्यातही महिला वर्ग तर या श्रावण महोत्सवाची आतुरतेने वाट पाहत असतो. कारण या श्रावण महोत्सवाचे निमीत्त साधून महिला वर्ग आपल्या पारंपरिक नऊवारी साडीमध्ये छान नटून थटून येतात आणि मग हळदी कुंकू समारंभ, उखाणे स्पर्धा आदी कार्यक्रमानंतर सुग्रास अशा या श्रावण स्पेशल जेवणाच्या थाळीवर यथेच्छ ताव मारला जातो.
श्रावण मास…अर्थातच श्रावण महिन्याला आपल्याकडे अनन्यसाधारण महत्त्व आहे. हा श्रावण महिना अध्यात्मिक परंपरेसोबतच आपल्या खाद्यसंस्कृतीसाठीही तितकाच महत्त्वाचा समजला जातो. मात्र काळाच्या ओघात आणि पाश्चिमात्य फास्ट फूडचा वाढत चाललेला पगडा पाहता जय मल्हार कॅफेच्या नयना समर घोलप यांनी ही मराठमोळी खाद्यसंस्कृती जपण्यासाठी सुरू केलेल्या या अनोख्या श्रावण महोत्सवाचे नक्कीच कौतुक करावे लागेल.
(8ऑगस्ट 2024) सुरू झालेला हा श्रावण महोत्सव पुढील महिन्याच्या म्हणजेच 5 सप्टेंबर 2024 पर्यंत चालणार असून दर्दी खवय्यांनी याठिकाणी एकदा तरी नक्कीच भेट देऊन या थाळीचा आस्वाद घेतला पाहिजे.
जय मल्हार कॅफे, म्हैसकर हॉस्पीटल समोर मुरबाड रोड, कल्याण पश्चिम