श्री गणेश मंदिर जीर्णोद्धार : दानशूर युवा उद्योजकाकडून डोंबिवलीच्या ग्रामदैवताला 30 किलो चांदी अर्पण

डोंबिवली : नीतू विश्वकर्मा
डोंबिवली शहराचे ग्रामदैवत असलेल्या फडके रोडवरील श्री गणेश मंदिराच्या स्थापनेला १०० वर्षे पूर्ण झाली आहेत. यानिमित्त श्री गणेश मंदिराचा जिर्णोद्धार केला जात असून त्यासाठी नांदेड येथील दानशूर युवा उद्योजकाने तब्बल 30 किलोहून अधिक चांदी भेट दिली आहे. सार्वजनिक बांधकाममंत्री रविंद्र चव्हाण यांच्यासह श्री गणेश मंदिर संस्थानच्या प्रमूख पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत आज सकाळी हे दान अर्पण करण्यात आले.
डोंबिवलीचे ग्रामदैवत असलेल्या या श्री गणेश मंदिर संस्थानतर्फे शताब्दी महोत्सवानिमीत्त सुशोभीकरणाचे विविध उपक्रम राबवण्यात येत आहेत. त्यासाठी दानशूर व्यक्तींना आवश्यक त्या गोष्टींसाठी आवाहनही करण्यात आले आहे. त्यामध्ये अद्याप 100 ते दीडशे किलो चांदीची आवश्यकता असल्याबाबत श्री गणेश मंदिर संस्थानचे विश्वस्त राहुल दामले यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांना सांगितले. त्यावर रविंद्र चव्हाण यांनी सुमित मोगरे यांच्याशी संपर्क साधून याबाबत विचारणा केली असता युवा उद्योजक मोगरे यांनी लगेचच त्याला होकार दिला. त्यानुसार आज सकाळी 30 किलो 900 ग्राम वजनाची चांदीची वीट विधिवत श्री गणेश चरणी अर्पण करण्यात आली.
या मंदिराच्या सुशोभीकरणासाठी आम्ही अनेक दानशूर व्यक्तींना संपर्क केला असून त्याद्वारे बऱ्यापैकी चांदी आमच्याकडे उपलब्ध झाली आहे. दानशूर उद्योजक सुमित मोगरे यांनी आज श्री गणेश चरणी अर्पण केलेल्या 30 किलो चांदीमुळे मंदिराच्या जीर्णोद्धारसाठी मोठी मदत होईल असा विश्वास विश्वस्त राहुल दामले यांनी यावेळी व्यक्त केला.
सुमित मोगरे असे या युवा उद्योजकाचे नाव असून त्यांचे संपूर्ण कुटुंबिय हे वारकरी संप्रदायाशी जोडले गेले आहेत. काही महिन्यांपूर्वी मोगरे यांनी पंढरपूर येथील विठ्ठल मंदिरासाठी तब्बल 2 कोटी 40 लाखांची चांदी अर्पण केली होती. त्यापाठोपाठ आपण त्यांना संपर्क केल्यावर त्यांनी क्षणाचाही वेळ न दवडता डोंबिवलीच्या या श्री गणेश मंदिरसाठी इतक्या मोठ्या प्रमाणात चांदी अर्पण केल्याचे सांगत सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांनी मोगरे यांचे आभार मानले.
यावेळी श्री गणेश मंदिर संस्थानच्या अध्यक्ष अलका मुतालिक, कार्यवाह प्रविण दुधे यांच्यासह विविध पदाधिकारी उपस्थित होते.