Breaking NewsheadlineHeadline TodaykalyanKalyan Breaking News

दुर्गाडी किल्ल्याची डागडुजी : खासदार सुरेश (बाळ्या मामा) म्हात्रे यांचा एक फोन आणि उद्यापासून होणार काम सुरू.

 

कल्याण : नीतू विश्वकर्मा 

कल्याणचे ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वैभव असलेल्या दुर्गाडी किल्ल्याच्या डागडुजीचे काम आता उद्यापासून सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या दुर्गाडी किल्ल्याच्या बुरुजाची काल पडझड झाली असून भिवंडी लोकसभेचे नवनिर्वाचित खासदार सुरेश (बाळ्या मामा) म्हात्रे यांनी महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांसह दुर्गाडी किल्ल्याची पाहणी केली. त्यावेळी पी डबल्यू डी अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत ठाणे जिल्हाधिकाऱ्यांशी फोनवरून संपर्क साधला असता ठाणे जिल्हाधिकाऱ्यांनी उद्यापासूनच हे डागडुजीचे काम सुरू करण्याचे निर्देश दिले. 

दुर्गाडी किल्ल्याच्या प्रवेश द्वाराजवळील बुरुजाचा भाग काल रात्रीच्या सुमारास ढासळला. विशेष म्हणजे पी डब्ल्यू डी कडून काही वर्षांपूर्वीच या बुरुजाचे काम करण्यात आले होते. हा बुरुज ढासळल्याची माहिती मिळताच आज सायंकाळच्या सुमारास पी डब्ल्यू डी अधिकारी, केडीएमसी अधिकारी आदींच्या उपस्थितीत भिवंडीचे खासदार सुरेश (बाळ्या मामा) म्हात्रे यांनी आधी दुर्गाडी  किल्ल्यावरील दुर्गाडी देवीचे दर्शन घेत नंतर या ढासळलेल्या बुरुजाची पाहणी केली. 

त्यावेळी अधिकाऱ्यांकडून दुर्गाडी किल्ल्याच्या डागडुजीबाबत संपूर्ण माहिती जाणून घेतल्यानंतर त्यांनी ठाणे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांच्याशी फोनवर चर्चा केली. आणि लाखो भाविकांचे हे श्रद्धास्थान असलेल्या दुर्गाडी किल्ल्याच्या तातडीने डागडुजीचे महत्त्व त्यांना पटवून दिले. त्यावर ठाणे जिल्हाधिकाऱ्यांनी उपस्थित पी डब्ल्यू डी च्या अधिकाऱ्यांना फोनवरच उद्यापासून लगेचच किल्ल्याची डागडुजी सुरू करण्याचे आदेश दिल्याचे दिसून आले. त्यामुळे किल्ल्याच्या डागडुजीचा मार्ग आता मोकळा झाल्याचे सुरेश (बाळ्या मामा) म्हात्रे यांनी स्पष्ट केले. 

तर आपल्याला मतदारसंघात कामांचा दर्जा आणि गुणवत्तेशी तडजोड न करता चांगले काम करायचे आहे. त्यामुळे आपण विकासकामांसाठी कोणाकडूनही एक रुपया घेणार नाही. जर काम चांगले केले नाही तर, मग तो कंत्राटदार असो की शासकीय अधिकारी, त्यांचा कोणताही मुलाहिजा न ठेवता त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करू असा सज्जड दमही सुरेश (बाळ्या मामा) म्हात्रे यांनी यावेळी बोलताना दिला. 

तर खासदारकीची शपथ घेऊन झाल्यानंतर आपण कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघाच्या पाहणी दौऱ्यावर येणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.







Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Verified by MonsterInsights