अनंत चतुर्दशीसाठी केडीएमसी सज्ज; 109 कृत्रिम आणि नैसर्गिक विसर्जन स्थळी 180 सीसीटीव्हींची नजर.
कल्याण-डोंबिवली : नीतू विश्वकर्मा
गणेशोत्सवाच्या आजच्या म्हणेजच अनंत चतुर्दशी दिवशी होणा-या श्री गणेश विसर्जनासाठी महापालिका सज्ज झाली आहे. कल्याणातील 22 नैसर्गिक आणि 30 कृत्रिम तसेच डोंबिवलीतील 30 नैसर्गिक आणि 27 कृत्रिम अशा 109 ठिकाणी श्री गणेश विसर्जनाची व्यवस्था करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे महापालिकेच्या सर्व प्रभागात “विसर्जन आपल्या दारी” ही संकल्पनाही राबवली जाणार असल्याची माहिती केडीएमसी आयुक्त डॉ. इंदू राणी जाखड यांनी दिली आहे.
180 सीसीटिव्हींची करडी नजर…
कल्याण डोंबिवलीतील महापालिकेच्या विद्युत विभागामार्फत एकूण 70 जनरेटर, 2735 हॅलोजन, 103 टॉवर लाईटिंग, 180 सीसीटीवी कॅमेरे यांची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. तर महापालिकेच्या अग्निशमन विभागामार्फत दुर्गाडी गणेशघाट येथे ठेकेदाराचे 16 कर्मचारी (गोताखोर) आणि अग्निशमन विभागातील 6 कर्मचारी, लाईफ बोट, लाईफ जॅकेट, रस्सी, रबर बोट इ. साधन सामुग्रीही उपलब्ध असणार आहे.
या नैसर्गिक विसर्जन ठिकाणीही चोख व्यवस्था…
त्याचप्रमाणे मोहने पंपींग स्टेशन गणेशघाट, यादवनगर गणेश घाट सिनेटरी अटाळी नदी, काळु नदी, वासुंद्री नदी, हनुमान मंदिर तलाव मांडा, बल्याणी तलाव, मोहिली पंप गणेश घाट, खारी आंबिवली गणेश घाट, गांधारी नदी, परिवहन गणेश घाट, गौरीपाडा तलाव, आधारवाडी तलाव, सापर्डे तलाव, उंबर्डे तलाव, नांदीवली व द्वारली तलाव, देवीचौक गणेश घाट, उमेशनगर, जुनी डोंबिवली गणेशघाट, कोपर तलाव, राजुनगर गणेशघाट, गणेशनगर खाडी, गोलवली तलाव, कुंभारखानपाडा तलाव गणेशघाट, लोढा संकुल /खाडी, निळजे तलाव, आयरेगाव तलाव, ठाकुर्ली चोळेगांव तलाव, भोईरवाडी तलाव आणि मोठा गाव गणेश घाट, इ. नैसर्गिक विसर्जन स्थळी देखील अग्निशमन विभागामार्फत सुविधा – कर्मचारी तैनात राहणार आहेत.
निर्माल्य संकलनाची अशी आहे व्यवस्था…
सर्व विसर्जन स्थळांवर घनकचरा व्यवस्थापन विभागामार्फत कर्मचा-यांचे नियोजन करण्यात आले आहे. प्रमुख नैसर्गिक विसर्जन स्थळी, निर्माल्य कलश तसेच सजवलेली घंटागाडी उपलब्ध राहणार आहे. त्याचप्रमाणे कृत्रिम तलावाच्या ठिकाणीही निर्माल्य संकलनाची व्यवस्था करण्यात आली आहे. एनएनएसचे विद्यार्थी आणि विविध स्वयंसेवी संस्थांचे (एनजीओ) स्वयंसेवक निर्माल्य संकलनासाठी महापालिकेस सहाय्य करणार असल्याचेही आयुक्त डॉ. जाखड यांनी सांगितले.