कल्याणच्या राधानगर परिसरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न तातडीने सोडवा – माजी आमदार नरेंद्र पवार यांच्या ट्रॅफिक पोलिसांना सूचना.

कल्याण : नीतू विश्वकर्मा
कल्याण पश्चिमेच्या खडकपाडा परिसरातील राधानगर भागात गेल्या काही महिन्यांपासून मोठ्या प्रमाणात होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. ही वाहतूक कोंडी फोडण्यासाठी तातडीने उपाय योजना करण्यासह पी 1- पी2 सारखे पार्किंग धोरण राबविण्याची सूचना माजी आमदार नरेंद्र पवार यांनी केली आहे. भारतीय जनता पक्षाच्या सरचिटणीस साधना गायकर यांच्या कार्यालयात वाहतूक पोलिसांसोबत झालेल्या बैठकीत पवार यांनी या सूचना केल्या आहेत.
कल्याण पश्चिमेतील खडकपाडा परिसर आणि यामध्ये येणाऱ्या राधा नगर हा नव्या कल्याणचा महत्त्वाचा भाग आहे. विशेष म्हणजे या एकाच परिसरात 3 मोठी रुग्णालये, शाळा, डान्स स्कूल आदींसह मोठी बाजारपेठही आहे. परिणामी इथल्या मुख्य रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात होणाऱ्या वाहनांचे पार्किंग वाहतूक कोंडीला कारणीभूत ठरत आहे. परिणामी स्थानिक नागरिकांना आणि इथल्या व्यापाऱ्यांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे.
यासंदर्भात स्थानिक नागरिक आणि व्यापाऱ्यांनी भाजप सरचिटणीस साधना गायकर यांच्याकडे वारंवार तक्रारी केल्या होत्या. त्या पार्श्वभूमीवर माजी आमदार नरेंद्र पवार यांच्या पुढाकाराने साधना गायकर यांच्या कार्यालयात वाहतूक पोलिसांच्या अधिकाऱ्यांची एक महत्त्वपूर्ण बैठक संपन्न झाली. ज्यामध्ये या परिसरातील वाहतूक कोंडीवर लवकरात लवकर ठोस उपाय योजना करण्याची आग्रही मागणी माजी आमदार पवार यांनी यावेळी केली. तसेच वाहनांच्या पार्किंगसंदर्भात पी1-पी2 सारखे धोरण राबविण्याची सूचना करत तातडीने ही वाहतूक कोंडी फोडण्याची सूचना केली. तर नागरिकांची समस्या जाणून घेत त्यासाठी बैठक लावल्याबद्दल स्थानिक नागरिक आणि व्यापाऱ्यांनी माजी आमदार नरेंद्र पवार आणि सरचिटणीस साधना गायकर यांचे विशेष आभार मानले.
या बैठकीला माजी परिवहन सदस्य तथा कल्याण पश्चिम विधानसभा संयोजक स्वप्निल काटे, भाजपा वॉर्ड अध्यक्ष सुनिल चव्हाण, प्रविण देशपांडे, राजेश लिंबाचिया, सच्चिदानंद दुबे, उमेश झुंजारराव, सुभाष वाणी, सतीश त्रिपाठी, पल्लवी खंडागळे, सुमित शाह, श्रीकांत शेळके आदी पदाधिकारी, कार्यकर्ते, व्यावसायिक व नागरिक उपस्थित होते.