थायलंडमधून आणलेल्या महिलांची सुटका – ठाणे गुन्हे शाखेच्या खंडणीविरोधी पथकाची धडक कारवाई.
उल्हासनगर : नीतू विश्वकर्मा
ठाणे शहरातील गुन्हे शाखेच्या खंडणीविरोधी पथकाने उल्हासनगरमधील सितारा लॉजिंग ऐंड बोर्डिंग, सेक्शन १७ येथे छापा मारून थायलंड देशातून आणलेल्या १५ महिलांची सुटका केली आहे. या महिलांना वेश्या व्यवसायासाठी फसवून आणले होते. पोलिसांनी या प्रकरणात लॉजच्या मॅनेजरसह चार कामगारांना अटक केली आहे.
गुन्हे शाखेला मिळालेल्या माहितीनुसार, थायलंडमधील महिलांना चांगल्या रोजगाराच्या संधी दाखवून भारतात आणले जात होते. त्यानंतर उल्हासनगरमधील सितारा लॉजिंगमध्ये त्यांना वेश्याव्यवसायासाठी जबरदस्तीने वापरले जात होते. मिळालेल्या माहितीच्या आधारे खंडणीविरोधी पथकाचे प्रभारी अधिकारी शेखर वागडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक नरेश पवार आणि त्यांच्या पथकाने २ ऑक्टोबर २०२४ रोजी रात्री बनावट ग्राहक पाठवून छापा टाकला.
या कारवाईत लॉजचा मॅनेजर कुलदीप उर्फ पंकज जयराज सिंग (३७ वर्षे) आणि चार कामगारांना ताब्यात घेण्यात आले. या छाप्यात पोलिसांनी ५,२७,००० रुपये रोख रक्कम आणि इतर साधने जप्त केली आहेत. पोलिसांनी अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंध अधिनियम १९५६ अंतर्गत संबंधितांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
ही कारवाई पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे, सहआयुक्त डॉ. ज्ञानेश्वर चव्हाण, अपर पोलीस आयुक्त डॉ. पंजाबराव उगले, पोलीस उपआयुक्त शिवराज पाटील, सहायक पोलीस आयुक्त राजकुमार डॉंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली खंडणीविरोधी पथकाने केली.