उल्हासनगर रेल्वे स्थानक पश्चिमेकडील अनधिकृत वाहनतळावर महापालिकेची कारवाई.

उल्हासनगर: नीतू विश्वकर्मा
माननीय आयुक्त यांच्या मौखिक निर्देशानुसार उल्हासनगर महानगरपालिकेच्या वतीने उल्हासनगर रेल्वे स्थानक पश्चिम येथील अनधिकृत वाहनतळावर कारवाई करण्यात आली. या कारवाईत महापालिका व पोलिस विभागाच्या संयुक्त कार्यवाहीने सुमारे २०० दुचाकी वाहनांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली.
ही कारवाई उपायुक्त मालमत्ता विभागाचे मा. अजय साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. या वेळी सहाय्यक पोलीस आयुक्त मा. विजय पोवार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक (वाहतूक शाखा) मा. सुखदेव पाटील, प्रभाग क्रमांक तीनच्या सहायक आयुक्त श्रीमती सलोनी निवकर, मालमत्ता व्यवस्थापक श्रीमती मधुरा केणी तसेच संबंधित विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
कारवाई दरम्यान प्रत्येक दूचाकी वाहनावर पाचशे रुपये दंड आकारण्यात आला असून अनधिकृतपणे पार्क करण्यात आलेली वाहने जप्त करण्यात आली आहेत. ही कारवाई अनधिकृत वाहनतळांवर नियंत्रण आणण्यासाठी करण्यात आली असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
महानगरपालिका व वाहतूक पोलीस विभागाच्या या संयुक्त मोहिमेमुळे अनधिकृत पार्किंग व्यवस्थेवर आळा बसण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.