उल्हासनगर महानगरपालिकेत “पत्रकार दिन” उत्साहात साजरा.

उल्हासनगर: नीतू विश्वकर्मा
दिनांक ६ जानेवारी २०२५ रोजी उल्हासनगर महानगरपालिका मुख्यालयातील मा. महासभागृहात सायंकाळी ५ वाजता “पत्रकार दिन” कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. प्रशासक तथा आयुक्त श्री. विकास ढाकणे आणि अतिरिक्त आयुक्त श्री. जमीर लेंगरेकर यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन आणि मराठी पत्रकारितेचे जनक आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. या प्रसंगी महापालिका प्रशासक तथा आयुक्त श्री. विकास ढाकणे, अति. आयुक्त श्री. जमीर लेंगरेकर, उपायुक्त श्री. अजय साबळे, सहा. आयुक्त श्रीमती मयुरी कदम तसेच ज्येष्ठ पत्रकार श्री. दिलीप मालवनकर आणि श्री. नानिकराम मंगलानी उपस्थित होते.
पत्रकारांच्या सन्मानार्थ पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात पत्रकार श्री. रविंद्र धांडे, श्री. प्रफुल केदारे आणि महापालिका कर्मचारी श्री. सतीश राठोड यांनी सादर केलेल्या गीतांनी झाली. यानंतर काही पत्रकारांनी आपली मनोगते व्यक्त केली.
महापालिका प्रशासक तथा आयुक्त श्री. विकास ढाकणे यांनी उपस्थित सर्व पत्रकारांचे स्वागत करून त्यांना शुभेच्छा दिल्या. अतिरिक्त आयुक्त श्री. जमीर लेंगरेकर यांनीही आपल्या मनोगतातून पत्रकारांच्या योगदानाचा गौरव केला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जनसंपर्क अधिकारी सौ. छाया डांगळे यांनी केले. या वेळी महापालिकेचे वरिष्ठ अधिकारी तसेच प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडियाचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते. लोकमतचे श्री. सदानंद नाईक, आपलं महानगर व मुंबई चौफेरचे श्री. राजू गायकवाड, दंबग दुनियाचे श्री. दिलीप मिश्रा, ABP माझाचे श्री. सुरेश काते, साम टीव्हीचे श्री. अजय दुधाणे, लोकशाही चॅनलचे श्री. किरण तेलगोटे आदी मान्यवर पत्रकार या कार्यक्रमाचे साक्षीदार होते.
कार्यक्रमाच्या समारोपात उपस्थित पत्रकारांना सन्मानचिन्ह व भेटवस्तू देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला.