उल्हासनगर डंपिंग ग्राउंडवरील अनधिकृत बांधकामांवर महानगरपालिकेची कारवाई.

उल्हासनगर: नीतू विश्वकर्मा
२४ फेब्रुवारी २०२५: उल्हासनगर महानगरपालिका प्रशासनाने हनुमाननगर, डंपिंग ग्राऊंड, उल्हासनगर-२ येथील शासकीय भूखंडावरील अनधिकृत बांधकामांवर कठोर कारवाई करत ती निष्कासित केली.
महानगरपालिका प्रभाग समिती क्र. २ च्या हद्दीत दुर्गानगर आणि डंपिंग ग्राऊंड परिसरातील मोकळ्या भूखंडावर अनधिकृतपणे बांधकामे होत असल्याची माहिती प्रशासनाला मिळाली होती. या पार्श्वभूमीवर अतिरिक्त आयुक्तांनी त्वरित कारवाईचे आदेश दिले. त्यानुसार, २४ फेब्रुवारी २०२५ रोजी पोलिस बंदोबस्ताच्या उपस्थितीत ही कारवाई करण्यात आली.
या मोहिमेत १० खोल्यांचे जोत्यांचे बांधकाम, ५ पक्क्या खोल्यांचे बांधकाम आणि २ झोपड्यांचे बांधकाम पूर्णपणे हटवण्यात आले. ही कारवाई सहायक आयुक्त, प्रभाग समिती क्र. २ आणि अबानिवि विभागाच्या नोडल अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.
महानगरपालिकेने नागरिकांना अनधिकृत बांधकामे टाळण्याचे आवाहन केले असून, भविष्यात अशा प्रकारच्या कारवाया सातत्याने करण्यात येणार असल्याचे संकेत दिले आहेत.