उल्हासनगर फायर ब्रिगेड संकटात: लँडलाइन बंद, कर्मचाऱ्यांचे दोन महिन्यांचे पगार रखडले

उल्हासनगर: नीतू विश्वकर्मा
२४ फेब्रुवारी २०२५: शहराच्या आपत्कालीन सेवांमध्ये गंभीर त्रुटी उघडकीस आल्या आहेत. नेताजी चौक, उल्हासनगर-५ येथील फायर ब्रिगेड विभागाची लँडलाइन १६ फेब्रुवारीपासून बंद आहे, ज्यामुळे नागरिक आपत्कालीन प्रसंगी थेट संपर्क साधू शकत नाहीत. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे अंबरनाथ विधानसभा अधिकारी राज प्रकाश महाडिक यांनी उल्हासनगर महानगरपालिकेकडे तातडीने उपाययोजनांची मागणी केली आहे.
महाडिक यांच्या म्हणण्यानुसार, विभागातील कर्मचाऱ्यांचे गेल्या दोन महिन्यांपासून पगार रखडले आहेत. तरीही कर्मचारी आपले कर्तव्य निःपक्षपातीपणे पार पाडत आहेत. परंतु प्रशासनाने या मूलभूत गरजांकडे दुर्लक्ष करणे, ही अत्यंत गंभीर बाब आहे.
महाडिक यांनी महापालिकेकडे तीन प्रमुख मागण्या केल्या आहेत:
- लँडलाइन त्वरित सुरू करणे आणि नागरिकांसाठी बॅकअप संपर्क क्रमांक उपलब्ध करून देणे.
- कर्मचाऱ्यांचे रखडलेले वेतन तत्काळ देणे, जेणेकरून त्यांची आर्थिक अडचण दूर होईल.
- फायर ब्रिगेडच्या पायाभूत सुविधांचे पुनरावलोकन करून सुधारणा करणे, जेणेकरून भविष्यात अशा समस्या उद्भवू नयेत.
उल्हासनगर फायर ब्रिगेडच्या कार्यक्षमतेवर हजारो नागरिकांचे जीवन अवलंबून आहे. या तांत्रिक अडचणी आणि प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे आपत्कालीन परिस्थितीत मोठी दुर्घटना घडल्यास जबाबदारी कोणाची असेल? नागरिकांनी यावर गंभीर विचार करणे गरजेचे आहे.