उल्हासनगरमध्ये अनधिकृत बांधकामाचा वाढता धोका: प्रशासनाच्या दुर्लक्षतेमुळे अनधिकृत व्यापारी गाळ्यांचे बांधकाम सर्रासपणे सुरू

उल्हासनगर: नीतू विश्वकर्मा
उल्हासनगर-१ मधील प्रभाग क्रमांक १ अंतर्गत पॅनल क्रमांक २, बेरेक क्रमांक २२१, ढोलुराम दरबार जवळ, वाटिका बार शेजारी मोठ्या प्रमाणावर बांधकाम नियमांचे उल्लंघन होत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
परवानगीप्राप्त जुन्या बांधकामात मोठ्या प्रमाणावर नियमांचे उल्लंघन करून मोकळ्या जागेचा गैरवापर करत आरसीसी पद्धतीने तीन अनधिकृत दुकाने उभारण्यात आली आहेत. हे संपूर्ण बांधकाम महानगरपालिकेच्या नियमानुसार बेकायदेशीर असून, स्थानिक प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे अनधिकृत बांधकामांना खतपाणी मिळत असल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे.
या प्रकरणी जबाबदार प्रभाग अधिकारी अलका पवार आणि प्रभाग मुकादम राजू मोरे यांनी तातडीने कारवाई करणे आवश्यक आहे. स्थानिक नागरिकांनी उल्हासनगर महानगरपालिकेकडे या अनधिकृत बांधकामाविरोधात तक्रार दाखल केली असून, त्वरित कारवाईची मागणी केली आहे.
महानगरपालिकेच्या अनधिकृत बांधकाम निर्मूलन विभागाने या प्रकरणाची तातडीने चौकशी करून संबंधित दोषींवर कठोर कारवाई करावी. अन्यथा भविष्यात अशा प्रकारच्या बेकायदेशीर बांधकामांना आणखी चालना मिळण्याची भीती व्यक्त केली जात आहे. प्रशासनाच्या कारवाईकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे.