उल्हासनगर कुर्ला कॅम्प-गुरुनानक शाळा-सेन्टर पार्क रस्ता लवकरच खुला होणार.

उल्हासनगर: नीतू विश्वकर्मा
गेल्या तीन-चार महिन्यांपासून कुर्ला कॅम्प – गुरुनानक शाळा – सेन्टर पार्क – स्टेशन रोड हा मार्ग ड्रेनेज लाईन टाकण्याच्या कामासाठी बंद करण्यात आला होता. पाणीपुरवठा विभागाने आपल्या कामकाजानुसार ड्रेनेज लाईन टाकून खोदलेला रस्ता पुन्हा भरून तयार केला आहे. मात्र, सार्वजनिक बांधकाम विभागाकडून अद्याप रस्त्याचे काम पूर्ण झालेले नाही.
रस्त्याच्या अपूर्ण स्थितीमुळे स्थानिक नागरिकांना मोठ्या प्रमाणावर त्रास सहन करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर, दिनांक 10 फेब्रुवारी 2025 रोजी सार्वजनिक बांधकाम विभागाला दुसरे निवेदन देण्यात आले. या निवेदनात, रस्ता दहा दिवसांच्या आत पूर्ण करून नागरिकांच्या वाहतुकीसाठी खुला करावा, अन्यथा आंदोलनाचा इशारा देण्यात आल्याचे ॲड. प्रशांत चंदनशिव यांनी स्पष्ट केले.
यानंतर सार्वजनिक बांधकाम विभाग तसेच संबंधित ठेकेदारांनी पुढील आठवड्यात रस्ता वाहतुकीसाठी सुरू करण्यात येईल, असे आश्वासन दिले आहे. या निर्णयामुळे स्थानिक रहिवाशांना मोठा दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे.