भीमनगरमध्ये कामगारावर जीवघेणा हल्ला; पोलीस प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह?

उल्हासनगर – नीतू विश्वकर्मा
उल्हासनगर-१ येथील भीमनगरमध्ये गुरुवार, ६ मार्चच्या मध्यरात्री १.३० वाजता सेंच्युरी रेयॉनच्या कामगारावर अज्ञात गुन्हेगारांनी धारदार शस्त्राने प्राणघातक हल्ला केला. या हल्ल्यात संतोष भीमराव नाईकवाडे (वय ४५) हे गंभीर जखमी झाले असून, त्यांच्या डोक्याला मोठी दुखापत झाली आहे आणि उजव्या हाताचे एक बोट पूर्णतः तोडले गेले आहे.
पीडित नाईकवाडे यांच्यावर सध्या मध्यवर्ती रुग्णालयात उपचार सुरू आहेत. डॉक्टरांच्या माहितीनुसार, जखमी बोटावर आधीच एक शस्त्रक्रिया करण्यात आली आहे, मात्र संसर्ग झाल्यास त्याला पूर्णतः कापावे लागू शकते, त्यामुळे दुसऱ्या शस्त्रक्रियेची शक्यताही व्यक्त करण्यात आली आहे.
पोलीस कारवाईवर नाराजी
या गंभीर घटनेनंतरही उल्हासनगर पोलिसांनी हल्लेखोरांविरोधात केवळ भारतीय दंड संहितेच्या कलम ३२४ (स्वेच्छेने घातक शस्त्राने जखमी करणे) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. स्थानिक रहिवाशांनी आणि पीडिताच्या कुटुंबीयांनी या घटनेतील मुख्य आरोपींची नावे गुन्ह्यातून वगळण्यात आल्याचा आरोप केला आहे. तसेच, राजकीय दबावामुळे पोलिसांवर प्रभाव पडत असल्याची चर्चा आहे.
दरम्यान, पीडित नाईकवाडे मृत्यूशी झुंज देत असताना हल्लेखोर मोकाट फिरत असून, त्यांच्यावर अद्याप कठोर कारवाई झालेली नाही. स्थानिक नागरिक आणि कामगार संघटनांनी या घटनेचा तीव्र निषेध नोंदवला असून, आरोपींवर कठोर कारवाईची मागणी केली आहे.