कल्याण-उल्हासनगरमध्ये ऑनलाईन लॉटरीचा स्फोट! न्यायालयाच्या आदेशांचा गैरवापर करून खुलेआम जुगार व्यवसायाचा गोरखधंदा।

उल्हासनगर: नीतू विश्वकर्मा
कल्याण, उल्हासनगर, डोंबिवली (DCP झोन 3, 4) : कल्याण पूर्व, कल्याण पश्चिम, उल्हासनगर आणि डोंबिवली पूर्व येथे WIN GAME ऑनलाईन लॉटरी जुगाराचा महासाथ पसरला असून, हा अवैध धंदा पोलिस प्रशासनाच्या नाकाखाली जोमात सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. माननीय उच्च न्यायालयाच्या आदेशांची सर्रास पायमल्ली करून, खोटे दस्तऐवज वापरून, नियमांची खुलेआम पायमल्ली केली जात असून, पोलिसांची दिशाभूल करून हा मोठा गैरव्यवहार सुरू असल्याचे उघड झाले आहे.
पोलिस प्रशासनाकडून डोळेझाक?
कल्याण स्टेशन रोड, डोंबिवली, उल्हासनगर आणि संपूर्ण झोन 3 आणि 4 मध्ये जुगाराचे अड्डे धडाक्याने सुरू असून, पोलिस प्रशासनाकडून याकडे दुर्लक्ष केले जात आहे. कायद्याचे उल्लंघन होत असतानाही या धंद्यांवर कारवाई का केली जात नाही, हा मोठा प्रश्न उपस्थित झाला आहे.
युवापिढी धोक्यात – मोठ्या घोटाळ्यांची शक्यता!
या ऑनलाईन जुगारामुळे तरुण पिढी व्यसनाच्या विळख्यात सापडत असून, आर्थिक लूट व सामाजिक अपराधिक घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. आर्थिक गुंतवणुकीच्या नावाखाली सामान्य नागरिकांची मोठ्या प्रमाणावर फसवणूक होत असून, या जुगाराच्या आडून काळा पैसा पांढरा करण्याचा गंभीर प्रकार देखील समोर येत आहे.
सरकार आणि पोलीस यंत्रणेला जाग कधी येणार?
न्यायालयाच्या आदेशांचा गैरवापर करून सुरू असलेल्या या अवैध धंद्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिक व सामाजिक संघटनांकडून जोर धरत आहे. आता सरकार आणि पोलिस प्रशासन यावर काय कारवाई करणार, याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे.
काय कल्याण-उल्हासनगरचा ऑनलाईन जुगार माफिया शेवटी गजाआड होईल? की हा सारा खेळ अशाच प्रकारे सुरू राहील?