उल्हासनगर काँग्रेस कमिटीच्या बैठकीत महापालिका निवडणुकीसाठी रणनीती निश्चित, पक्षप्रवेश कार्यक्रम संपन्न.

उल्हासनगर: नीतू विश्वकर्मा
उल्हासनगर, ३ डिसेंबर: उल्हासनगर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने महत्वपूर्ण बैठक संपन्न झाली. या बैठकीत पक्षाची आगामी रणनिती ठरविण्यात आली असून इच्छुक उमेदवारांशी विस्तृत चर्चा करण्यात आली.
जिल्हा काँग्रेस अध्यक्ष रोहित साळवे यांनी सर्व पदाधिकारी व इच्छुक उमेदवारांना तातडीने कामाला लागण्याच्या सूचना दिल्या. त्यांनी पक्षाची भूमिका स्पष्ट करताना सांगितले की, काँग्रेसने प्रमुख विरोधी पक्ष म्हणून नागरी समस्या सोडविण्यासाठी पुढाकार घ्यावा, जनतेला सत्ताधाऱ्यांच्या भ्रष्ट कारभाराबाबत जागरूक करावे, आंदोलने करावी, तसेच लोकहितकारी कार्यक्रम आणि शासकीय योजना प्रभावीपणे राबवाव्यात.
बैठकीत महापालिका निवडणुकीसाठी सुशिक्षित, समाजसेवेस तत्पर आणि समान विचारधारा असलेल्या नवीन चेहऱ्यांना संधी देण्याबाबत ठराव करण्यात आला. योग्य उमेदवारांना तिकीट वाटप करण्याच्या दृष्टीने वरिष्ठ नेतृत्वाच्या मार्गदर्शनाखाली निर्णय घेतला जाईल, असे यावेळी स्पष्ट करण्यात आले.
बैठकीनंतर प्रसिद्ध दंतचिकित्सक डॉ. हितेश सचवाणी यांनी काँग्रेस पक्षाच्या विचारधारेवर विश्वास व्यक्त करत अधिकृत पक्षप्रवेश केला. राहुल गांधी यांच्या नेतृत्वावर तसेच प्रांताध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ व जिल्हाध्यक्ष रोहित साळवे यांच्या मार्गदर्शनावर विश्वास ठेवून त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला.
या बैठकीस जिल्हाध्यक्ष रोहित साळवे, प्रवक्ता आसाराम टाक, ब्लॉक अध्यक्ष किशोर धडके, नानिक आहुजा, सुनिल बहरानी, जिल्हा उपाध्यक्ष शाम मढवी, जिल्हा महासचिव दिपक सोनोने, युवराज पगारे, वामदेव भोयर, आबासाहेब साठे, निलेश जाधव, ईश्वर जग्यासी, दिपक गायकवाड, अन्सार शेख, उषा गिरी, विद्या शर्मा यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.