गोपाल तिवारी यांच्या उपस्थितीत उल्हासनगर काँग्रेसची महत्त्वपूर्ण बैठक — मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संघटनात्मक बांधणीला गती.



उल्हासनगर : नीतू विश्वकर्मा
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष श्री हर्षवर्धन सपकाळ यांच्या आदेशानुसार राज्यातील आगामी महानगरपालिका निवडणुकांशी संबंधित आढावा घेण्यासाठी निरीक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. उल्हासनगरसाठी काँग्रेसचे महाराष्ट्र सचिव व प्रमुख प्रवक्ते श्री गोपाल तिवारी यांची नियुक्ती करण्यात आली असून, त्यांनी दिनांक ११ एप्रिल रोजी उल्हासनगर दौरा करत नेहरू भवन, नेहरू चौक येथे महत्त्वपूर्ण बैठक घेतली.
बैठकीपूर्वी आयोजित पत्रकार परिषदेत श्री तिवारी यांनी केंद्र व राज्य सरकारवर तीव्र टीका केली. त्यांनी बेरोजगारी, महागाई यांसारख्या मुद्द्यांवरून जनतेचे लक्ष विचलित करण्यासाठी भाजप सरकार धार्मिक द्वेष पसरवत असल्याचा आरोप केला. “दहा वेळा निवडून आलेल्या काँग्रेसला दोन वेळा निवडून आलेले मोदी सरकार देश चालवण्याचा सल्ला देत आहेत, हे म्हणजे दोन वेळा जिंकलेला पैलवान, दहा वेळा जिंकलेल्या पैलवानाला पैलवानी शिकवत आहे,” अशा शब्दांत त्यांनी टोला लगावला.
त्याचप्रमाणे राज्यातील महिलांना दरमहिना ₹२१०० देण्याचे आश्वासन पूर्ण न करणाऱ्या शिंदे सरकारवरही त्यांनी टीका केली. “कर्नाटकातील काँग्रेस सरकारने दिलेला शब्द कसा पाळला हे पाहावे,” असा सल्ला त्यांनी दिला. उल्हासनगर महानगरपालिकेत सध्या प्रचंड भ्रष्टाचार असून नागरी सुविधा ठप्प झाल्याचा आरोप करत, उल्हासनगर काँग्रेसच सध्या प्रमुख विरोधी पक्ष म्हणून कार्यरत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
या बैठकीत संघटनात्मक बांधणीसाठी विविध प्रभागांमध्ये कार्यक्रम राबवण्याच्या सूचना देण्यात आल्या. सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून पक्ष बळकट करण्यासाठी सूचना मागवण्यात आल्या.
बैठक संपल्यानंतर क्रांतिसूर्य महात्मा फुले यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. काँग्रेस पक्ष नेहमीच फुले यांच्या विचारांची जोपासना करत राहील, असेही यावेळी सांगण्यात आले.
या बैठकीस उल्हासनगर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष रोहित साळवे, ब्लॉक अध्यक्ष किशोर धडके, सुनील बेहराणी, कुलदीप ऐलसिंहाणी, प्रदेश प्रतिनिधी वज्झरुद्दीन खान, शंकर आहुजा, अशेराम टाक, अजीझ खान, प्रो. गेम्नांनी, फमीदा सय्यद, नियाज खान, राजेश फक्के, बापू पगारे, रोहित ओव्हल, दीपक सोनवणे, वामदेव भोयर, निलेश जाधव, पुष्पलता सिंघ, आबा साठे, अन्सार शेख, उषा गिरी, विद्या शर्मा, देव आठवले, मनोहर मनुजा, पुरशोत्तम मढवी, ईश्वर जागियासी, सॅम्युअल मावची व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.