महापुरुषांच्या संयुक्त जयंतीनिमित्त स्वराज्य संघटनेच्यावतीने महाआरोग्य शिबिर यशस्वी.






उल्हासनगर, प्रतिनिधि: नीतू विश्वकर्मा
दि. ४ मे २०२५ — महापुरुषांच्या संयुक्त जयंतीनिमित्त स्वराज्य संघटनेच्या वतीने कुर्ला कॅम्प येथील काली माता मंदिर, उल्हासनगर-४ येथे भव्य महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून सुमारे ४०० नागरिकांनी सहभाग नोंदवला.
या शिबिरात विविध मोफत वैद्यकीय सुविधा नागरिकांसाठी उपलब्ध करून देण्यात आल्या. यामध्ये मोफत औषधवाटप, विविध आजारांची तज्ज्ञ डॉक्टरांकडून तपासणी, स्त्रीरोग व बालरोग सल्ला, दंतचिकित्सा, नेत्रतपासणी, मधुमेह, थायरॉईड (TSH), क्षयरोग (TB), ECG, X-ray व कॉलेस्ट्रॉल तपासणी यांचा समावेश होता. या सुविधांमुळे अनेक नागरिकांना वेळेवर निदान व योग्य वैद्यकीय मार्गदर्शन मिळाले.
कार्यक्रमाचे आयोजन स्वराज्य संघटनेचे शशि सावंत, संघटक आयु. राहुल आढाव आणि खजिनदार ॲड. राहुल बनकर यांनी केले होते. शिबिरात विविध क्षेत्रातील नामवंत डॉक्टरांनी सहभाग घेत नागरिकांची तपासणी केली. प्रमुख डॉक्टरांमध्ये डॉ. चंद्रकांत साळवे, डॉ. अजय गव्हाळे, डॉ. हेमंत चौधरी, डॉ. गोकुळदास अहिरे, डॉ. मुकुल वाणी, डॉ. रामचंद्र खरात, डॉ. सुनीता जगताप, डॉ. चंद्रकांत शिवशरण, डॉ. प्रतीक देहाडे, डॉ. भूषण साखरे, डॉ. हेमा लोहावे, डॉ. नागेश शेजव, डॉ. अर्चना जगताप, डॉ. नीलिमा थूल, डॉ. पंकज धनावडे, डॉ. आर्निस्ट दियास व डॉ. आसिया जबीन यांचा समावेश होता.
संघटनेचे संस्थापक अध्यक्ष ॲड. जय गायकवाड यांनी सांगितले की, “महाआरोग्य शिबिराच्या माध्यमातून स्थानिक नागरिकांच्या आरोग्यविषयक गरजा पूर्ण करण्याचा आमचा उद्देश असून, भविष्यातही अशा उपक्रमांच्या माध्यमातून सामाजिक कार्य सुरू राहील.”
नागरिकांनी या शिबिराचा मोठ्या प्रमाणावर लाभ घेतल्यामुळे उपक्रम अत्यंत यशस्वी ठरला.