उल्हासनगर महानगरपालिका घोषित करणार पाणीपुरवठ्याचं वेळापत्रक ! लवकरच सद्यस्थितीवर श्वेतपत्रिका !!
उल्हासनगर : नीतू विश्वकर्मा
कायद्याने वागा लोकचळवळीचे उल्हासनगर शहर अध्यक्ष प्रदीप कपूर यांनी पाणीप्रश्नावर दिलेल्या बेमुदत उपोषणाच्या पार्श्वभूमीवर, काल मंगळवार १८ जून रोजी अतिरिक्त आयुक्त जमीर लेंगरेकर यांनी बैठक बोलावली होती. उपायुक्त डाॅ. सुभाष जाधव, पाणीपुरवठा कार्यकारी अभियंता परमेश्वर बुडगे यांच्यासहित शहरातील सर्व अभियंते बैठकीला उपस्थित होते. कायद्याने वागा लोकचळवळीचं म्हणणं संस्थापक राज असरोंडकर आणि प्रदीप कपूर यांनी प्रभावीपणे मांडलं.
पाणी भरणं या कामाचा भार प्रामुख्याने स्त्रियांवरच येत असल्याने रात्रीअपरात्री पाणीपुरवठ्याची वेळ असू नये, स्त्रीयांच्या आरोग्याचा विचार करता, ती वेळ पहाटे ५ ते रात्री १० पर्यंतच असावी, ही मागणी प्रशासनाने तत्वत: मान्य केली व ती अंमलात आणण्यासाठी उपाययोजना केल्या जातील, असं आश्वासन दिलं.
आपली दैनंदिन पाण्याची वेळ किती वाजता आहे व किती कालावधीसाठी आहे, याची सुस्पष्ट माहिती नागरिकांना देणारं वेळापत्रक देणारी अधिसूचना आठवड्याभरात जारी करू, असंही प्रशासनाने मान्य केलंय.
जुनी वितरणव्यवस्था संपूर्णत: बंद करून जवाहरलाल नेहरू योजनेतर्गंत टाकण्यात आलेली वितरणव्यवस्थेमार्फतच पाणीपुरवठा करण्यासाठी टप्प्याटप्प्याने उपाययोजना करण्यात येतील, हे प्रशासनाने मान्य केलंय.
नागरिकांना एक दिवसाआड नव्हें तर दरदिवशी पुरेसा पाणीपुरवठा करण्यासाठी सद्य परिस्थितीचा अभ्यास करून निर्णय घेण्यात येईल, असं प्रशासनाकडून सांगण्यात आलं.
उल्हासनगर शहराचं क्षेत्र, लोकसंख्या, आवश्यक पाणीपुरवठा, मिळणाऱ्या पाण्याचं प्रमाण, वाटपाचं प्रमाण, गळती, पाणीप्रश्न सुटलेले परिसर, पाणीसमस्या असलेले परिसर, आजवर केलेल्या उपाययोजना, खर्च अशी विविधांगी सविस्तर माहिती नागरिकांसमोर ठेवणारी श्वेतपत्रिका महिन्याभरात जारी करण्याचं तसंच वितरणव्यवस्थेचे नकाशे पाणीपुरवठा कार्यालयात प्रकाशित करण्याचंही प्रशासनाने मान्य केलंय.
सबब, बुधवार १९ जूनपासूनचे संभाव्य बेमुदत उपोषण आंदोलन स्थगित करण्यात आलं आहे.
उपरोक्त सर्व मान्य केलेल्या मागण्यांबाबत रीतसर आदेश जारी केले जाणार असून ते आज दुपारपर्यंत प्राप्त होणं अपेक्षित आहे. सदरबाबत हयगय झाल्यास मात्र दुपारी ३ नंतर महापालिका मुख्यालयासमोर ‘ठिय्या’ करण्यात येईल, असं कायद्याने वागा लोकचळवळीचे प्रदीप कपूर यांनी घोषित केलं आहे.