विधानसभानिहाय आकडे समोर :डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या विजयात कल्याण ग्रामीणचा मोठा वाटा.
कल्याण : नीतू विश्वकर्मा
सर्वांचेच लक्ष लागलेल्या ठाणे जिल्ह्यातील कल्याण लोकसभा मतदारसंघात महायुतीच्या डॉ. श्रीकांत शिंदे यांचा 2 लाखांहून अधिक मतांनी विजय झाला. या लोकसभा निवडणुकीची विधानसभानिहाय आकडेवारी आता समोर आली असून डॉ. शिंदे यांच्या विजयामध्ये कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघाचा मोठा वाटा असल्याचे दिसत आहे.
लोकसभा निवडणुकीची मतमोजणी काल संपन्न झाली. त्यामध्ये कल्याण लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार आणि विद्यमान खासदार डॉ. श्रीकांत शिंदे हे सलग तिसऱ्यांदा निवडणुकीच्या रिंगणात उभे होते. महाराष्ट्रात दोन वर्षांपूर्वी झालेल्या राजकीय उलथापालथीनंतर होणाऱ्या या देशाच्या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले होते.
कल्याण लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार डॉ. श्रीकांत शिंदे हे सलग तिसऱ्यांदा दणदणीत मतांनी विजयी झाले आहेत. या विजयामध्ये मनसे आमदार राजू पाटील यांच्या कल्याण ग्रामीण मतदारसंघाने डॉ. शिंदे यांच्या विजयामध्ये सिंहाचा वाटा उचलला आहे. तर त्याखालोखाल डोंबिवली, अंबरनाथ, कल्याण पूर्व, उल्हासनगर आणि मग कळवा मुंब्रा विधानसभा मतदारसंघाचा क्रमांक लागत आहे.
डॉ. श्रीकांत शिंदे यांना मिळालेली विधानसभानिहाय मते
कल्याण ग्रामीण – 1 लाख 51 हजार 702
डोंबिवली – 99 हजार 734
अंबरनाथ – 93 हजार 670
कल्याण पूर्व – 87 हजार 129
उल्हासनगर 85 हजार 698
मुंब्रा कळवा – 69 हजार 988