गोविंदवाडी बायपास: खड्ड्यातून बाहेर आलेल्या लोखंडी सळ्या ठरू शकतात जीवघेण्या.
कल्याण : नीतू विश्वकर्मा
कल्याण डोंबिवली प्रशासनाच्या भोंगळ कारभाराचे आणखी एक ज्वलंत उदाहरण समोर आले आहे. दुर्गाडी चौकातून पत्रीपुलाकडे जाणाऱ्या मार्गावर रस्त्यातून बाहेर आलेल्या लोखंडी सळ्यांमुळे धोकादायक परिस्थितीत वाहन चालकांना प्रवास करावा लागत आहे. तर याबाबत केडीएमसी प्रशासनाने वेळेत कोणतीही उपाययोजना केली नाही तर याठिकाणी मोठा अपघात होण्याची शक्यता आहे.
पावसाळा आला की कल्याण डोंबिवलीकरांची अक्षरशः धाकधूक सुरू होते. कारण वाहतूक कोंडी, रस्त्यांवर पडणारे खड्डे आणि त्यामुळे घडणारे अपघातांचा विचार करून नागरिकांना घाम फुटतो. यंदाच्या पावसाळ्यातही काही वेगळी परिस्थिती नसून वाहतूक कोंडी आणि रस्त्यांवर खड्डे पडायला सुरुवात झाली आहे.
या पार्श्वभूमीवर गोविंदवाडी बायपास परिसरात दुर्गाडी चौकातून पत्रीपुलाकडे जाणाऱ्या मार्गावर बाहेर आलेल्या या लोखंडी सळ्यांकडे दुर्घटना घडण्यापूर्वी केडीएमसी प्रशासनाने लक्ष देण्याची गरज आहे. या मार्गावरून मोठ्या संख्येने वाहने वर्दळ सुरू असते. मुसळधार पावसामध्ये एखाद्या वाहन चालकाला या सळ्या न दिसल्यास किंवा त्यांना वाचण्याच्या नादामध्ये मोठी दुर्घटना घडू शकते.
बैल गेला आणि झोपा केला या म्हणीप्रमाणे अपघात घडल्यावर केडीएमसी प्रशासनाला जाग येते की त्यापूर्वी याची दखल घेऊन उपाययोजना केल्या जातात ते लवकरच कळेल.