आम्ही हार पचवून कामाला लागलो, पण त्यांना अद्याप विजय पचवता येत नाहीये – कपिल पाटील यांचा बाळ्या मामाना टोला.
कल्याण : नीतू विश्वकर्मा
निवडणुकीतील हार पचवून आम्ही दुसऱ्या दिवसापासून कामाला लागलो आहोत. मात्र त्यांना अद्याप विजय पचवता येत नसल्याचे सांगत माजी केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री कपिल पाटील यांनी भिवंडी लोकसभेचे नवनिर्वाचित खासदार सुरेश (बाळ्या मामा) म्हात्रे यांना टोला लगावला. कपिल फाउंडेशनच्या माध्यमातून कल्याणातील 900 विद्यार्थ्याचा आचार्य अत्रे रंगमंदिरात सन्मान करण्यात आला. त्यावेळी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना कपिल पाटील यांनी हा टोला लगावला.
लोकसभा निवडणुकीतील जनतेचा निर्णय आम्ही मान्य केला आहे. त्यामुळे या दिड महिन्यात आपण एकदाही त्यांच्यावर भाष्य केलेले नाहीये. आपल्याला एक लेव्हल मेन्टेन ठेवायची असून खालच्या पातळीवर जाऊन भाष्य करायला आवडत नाही. पण बहुधा कपिल पाटील यांचे नाव घेतल्याशिवाय त्यांना टी आर पी मिळत नसावा अशा शब्दांत पाटील यांनी खासदार म्हात्रे यांचा समाचार घेतला. तर आपल्यात एक क्षमता असून आपण कोणाच्याही जोरावर आणि भरवशावर निवडणूक लढायला जात नाही. आपल्या पक्षाने आदेश दिला तर आपण 100 टक्के विधानसभा निवडणुक लढवू. मात्र लोकांनी तुम्हाला माझ्यावर टिका करण्यासाठी नव्हे तर विकासासाठी निवडून दिले आहे. आणि नविन लोकप्रतिनिधीला वेळ देणे आवश्यक असून आपण वर्षभरानंतर त्यांच्यावर बोलू असे सांगत कपिल पाटील यांनी या विषयावर पडदा टाकला.
“आनंदीबाई जोशींपासून प्रेरणा घेत विद्यार्थ्यांनी निश्चित ध्येय गाठावे”
तर भारतातील पहिल्या महिला डॉ. आनंदीबाई गोपाळराव जोशी यांचा समृद्ध शैक्षणिक वारसा कल्याण शहराला लाभला असून, शहरातील गुणवंत विद्यार्थी-विद्यार्थीनींनी प्रेरणा घेऊन निश्चित ध्येय गाठावे. प्रत्येक विद्यार्थ्याने आत्मविश्वासाने आव्हान स्वीकारून प्रगती करावी, असे आवाहन माजी केंद्रीय पंचायती राज राज्यमंत्री कपिल पाटील यांनी केले. भाजपा कल्याण पश्चिम विधानसभा क्षेत्र आणि कपिल पाटील फाउंडेशनच्या वतीने कल्याण शहरातील 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा आचार्य प्रल्हाद केशव अत्रे रंगमंदिरात आज पार पडला. केंद्रीय पंचायती राज राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या हस्ते ९०० हून अधिक गुणवंतांचा सन्मान करण्यात आला. तसेच त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.