वाहतुकीसाठी कल्याण मुरबाड महामार्ग बंद रायते पुलावरून पाणी गेल्याने रस्ता खचला पुलाचे रेलिंग देखील तुटले.
कल्याण: नीतू विश्वकर्मा
गेले दोन दिवस झालेल्या मुसळधार पावसामुळे कल्याण मुरबाड मार्गावरील रायते पुलाला जोडणारा रस्ता खचला आहे. तसेच पाण्याच्या जोरदार प्रवाहामुळे या पुलावरील बॅरिकेटिंगही तुटली असल्याने सुरक्षिततेचा उपाय म्हणून या मार्गावरील वाहतूक बंद ठेवण्यात आल्याची माहिती कल्याणचे तहसिलदार सचिन शेजाळ यांनी दिली आहे.
परवा रात्रीपासून झालेल्या मुसळधार पावसामुळे काल कल्याण शहर आणि तालुका परिसरात पुर सदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती. पावसाचा रेटा इतका होता की कल्याण – मुरबाड मार्गावरील किशोर गावासह अतिशय महत्त्वाचा असलेल्या रायते पुलावरून पाणी वाहत होते. मात्र आता पावसाचा जोर ओसरल्यानंतर या पावसामुळे आणि नदीच्या पाण्याने झालेल्या या मार्गाच्या नुकसानाचे चित्र समोर आले आहे.
रायते पुलाच्या कल्याणकडून मुरबाडकडे जाणाऱ्या मार्गावर रस्त्याचा मोठा भाग पाण्याच्या जोरदार प्रवाहामुळे वाहून गेला आहे. या ठिकाणचा डांबरी रस्ता पूर्णपणे वाहून गेला असून त्याखाली भरावासाठी टाकण्यात आलेले दगड बाहेर आले आहेत. त्यासोबतच या पुलाच्या दोन्ही बाजूला बांधण्यात आलेले बॅरिकेटिंगही तुटल्या आहेत. यावरूनच कालच्या पुराच्या पाण्याच्या प्रवाहाचा अंदाज येऊ शकतो.
दरम्यान जोपर्यंत हा रस्ता दुरस्त होत नाही तोपर्यंत इथली वाहतूक बंद ठेवण्याचा निर्णय प्रशासनाकडून घेण्यात आला आहे. आज सकाळी कल्याणचे तहसिलदार सचिन शेजाळ यांच्यासह नॅशनल हायवे प्राधिकरणाचे अधिकारी पाहणी तसेच तपासणी करणार आहेत. याबाबत खात्री झाल्यानंतरच इथली वाहतूक सुरू करण्यात येईल अशी माहितीही तहसिलदार शेजाळ यांनी दिली आहे.