हेदुटणे,उत्तरशिवमधील जमीन रुग्णालय,गार्डन,क्रीडा संकुलांसाठी आरक्षित करा – मनसे आमदार प्रमोद (राजू) पाटील यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
कल्याण ग्रामीण : नीतू विश्वकर्मा
कल्याण ग्रामीण भागातील उत्तराशीव – हेदुटणे येथे गिरणी कामगारांसाठी घरांची निर्मिती करण्याच्या हालचाली सुरु झाल्या असून मनसे आमदार राजू पाटील आणि स्थानिक भूमिपुत्रांनी विरोध केला आहे. इथल्या गुरचरण जागेमध्ये गिरणी कामगारांच्या घरांऐवजी रुग्णालये, क्रीडासंकुल, गार्डन उभारण्याची मागणी आमदार राजू पाटील यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.
कल्याण ग्रामीण भागातील हेदुटणे – उत्तरशीव येथे म्हाडाच्या माध्यमातून घरांची निर्मितीसाठी शासन स्तरावर विचार केला जात आहे. मात्र गुरे चरण्यासाठी गावकऱ्यांनी अतिक्रमण न करता राखून ठेवलेली जमीन शासनाच्या नजरेत आली असून ताहिलदारांनी पोलीस फौज फाट्यासह जमिनीचे मोजमाप करण्याचा प्रयत्न केला होता. त्यावेळी कायदा सुरव्यवस्थेचा प्रश्न उद्भवू नये यासाठी आमदार राजू पाटील यांनी दूरध्वनीद्वारे ग्रामस्थ – तहसीलदार यांच्याशी संपर्क साधला. तसेच आमदार पाटील यांनी ठाणे जिलाधिकाऱ्यांसोबत बैठक घेण्याचे आश्वासन भूमिपुत्रांना देऊन संयम बाळगण्याची विनंती केली होती. यानंतर आता आमदार राजू पाटील यांनी थेट मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून या एकाच विभागात सर्व शासकीय प्रकल्प टाकण्यात येत असल्याबाबत नाराजी व्यक्त केली आहे.
याआधीपासूनच कल्याण तालुक्यातील खोणी, शिरढोण आणि ठाणे तालुक्यातील भंडार्ली, गोठेघर येथे म्हाडाचे प्रकल्प सुरु आहेत. तसेच एमएमआरडीए आणि खासगी विकासकांकडून मोठमोठाल्या गृह प्रकल्पांचे काम सुरू असून त्याठिकाणी पाणी, रस्ते, आरोग्य सेवा, गार्डन, खेळाची मैदाने आरक्षित नाहीत. कल्याण ग्रामीण भागात लोकसंख्या दिवसेंदिवस झपाट्याने वाढत चालली आहे. अशावेळी शासकीय जागा या रुग्णालये,खेळाची मैदाने यांसाठी आरक्षित करण्याची गरज अधोरेखित करत आमदार पाटील यांनी शासनाच्या या कारभारावर आक्षेप घेतला आहे.
गिरणी कामगारांच्या घरांना विरोध नाही…
तर आमचा गिरणी कामगारांच्या घरांना कोणत्याही प्रकारचा विरोध नाही. ज्या ठिकाणी गिरणी होत्या त्याच ठिकाणी गिरणी कामगारांना घरं मिळावीत अशी आमची भूमिका असल्याचे आमदार राजू पाटील यांनी मुख्यमंत्र्यांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे.