९६४ वर्षे पुरातन अंबरनाथचे प्राचीन शिवमंदिर !
अंबरनाथ : नीतू विश्वकर्मा
श्रावण शुद्ध नवमी शके १९४६, बुधवार दिनांक १४ ऑगस्ट २०२४ रोजी म्हणजे आज अंबरनाथ येथील प्राचीन शिवदिराचा ९६४ व्वा वर्धापन दिन. त्या निमित्त शिवभक्तांना शुभेच्छा ! या शिवमंदिर आणि आसपासच्या परिसराच्या सुशोभीकरणासाठी जे जे प्रयत्न करीत आहेत, त्यांच्या प्रयत्नांना शिवशंभो महादेवाने आशीर्वाद द्यावे, त्यांना सर्व ते बळ द्यावे आणि ही सर्व योजना वेळेच्या मर्यादेत पूर्ण होवो हीच शिवचरणी मनापासून प्रार्थना !
अंबरनाथच्या प्राचीन शिवमंदिरात तत्वज्ञान आहे. हे फार महत्वाचे मंदिर आहे. या शिवमंदिरात शिलालेख आहे. या शिलालेखात शक सवंत ९८२, श्रावण शुद्ध नवमी, सोमवार दिनांक ९ जुलै, इसवीसन १०६० यादिवशी शिलाहार राजा माम्वाणी याने या मंदिराचा जीर्णोद्धार पूर्ण केला, अशी नोंद आहे. महाराष्ट्रातील इतके जुने हे एकमेव मंदिर आहे. केवळ महाशिवरात्रीला किंवा श्रावण महिन्यांत जाऊन आपली जबाबदारी संपत नाही तर या मंदिराची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे. काळाचा स्पष्ट उल्लेख असलेली राज्यातील ही एक प्राचीन वास्तू आहे. सुमारे हजार वर्षांपूर्वी कशा प्रकारची सामाजिक आणि धार्मिक परिस्थिती इथल्या परिसरात अस्तित्त्वात होती, त्याचा हा एक ज्वलंत पुरावा आहे.
वर्तमानकाळात व्यक्ती आणि संस्थेचा रौप्य महोत्सव, सुवर्ण महोत्सव साजरा केला जातो. एखाद्या संस्थेचा शताब्दी किंवा शतकोत्तर सुवर्ण महोत्सवही होतो. मात्र त्या पलिकडे निश्चित तारखेने साजरे करावे, असे महाराष्ट्रात फारसे पुरावे नाहीत. अंबरनाथ शिव मंदिराचा अपवाद वगळता त्या व्यतिरिक्त हजार वर्षांपूर्वीचे पुरावे दुर्मिळ. रामटेक येथील केवलनरसिंह मंदिरात ५ व्या शतकातला वाकाटकांचा शिलालेख आहे. वेरूळचे कैलास लेणे आठव्या शतकातील आहे. त्यामुळे अंबरनाथकर अतिशय सुदैवी आहेत.
अंबरनाथमधील ज्येष्ठ नागरिक स्व. निळकंठ वझे, ज्येष्ठ पत्रकार कै. वसंतराव त्रिवेदी, वसंतराव त्रिवेदी यांचे दोन्ही सुपुत्र योगेश आणि गिरीश, स्व. लक्ष्मणराव कुलकर्णी, डॉ. पूर्वा अष्टपुत्रे, स्व. प्रा. अरुण मैड, प्रा. रेखा मैड आदी अनेकांनी मंदिराचे हे महात्म्य वेळोवेळी अधोरेखीत करण्याचा प्रयत्न केला आहे. गेल्या काही वर्षांपासून माध्यमांमध्ये सुद्धा या शिवमंदिराबाबत चांगली आणि ठळक प्रसिद्धी मिळत आहे. या मंडळींबरोबरच दादर येथील एक अभ्यासक, गेली तब्बल दोन दशके नियमितपणे मंदिराला भेट देऊन त्याचा अभ्यास करीत आहेत. त्यांचे नाव डॉ. कुमुद कानिटकर. मुंबईत दादरला राहणाऱ्या कुमुदताई या मूळ रसायनशास्त्राच्या प्राध्यापिका. रिझर्व्ह बँकेने १९९९ मध्ये एक दिनदर्शिका प्रसिद्ध केली होती. या मध्ये प्रमुख मंदिरांची छायाचित्रे प्रकाशित केली होती. या दिनदर्शिकेवर त्यांनी अंबरनाथ येथील प्राचीन शिवमंदिराचे छायाचित्र पाहिले. हे छायाचित्र पाहून त्यांनी या शिवमंदिराचा अभ्यास सुरु केला.
हे शिव मंदिर बांधले त्याकाळात सर्वसामान्य जनता निरक्षर होती. त्यांना अध्यात्म आणि तत्त्वज्ञान समजावून सांगण्यासाठी मंदिराच्या बाह्य भागावर अप्रतिम चित्रशिल्पे साकारण्यात आली आहेत. हजार वर्षांपूर्वी अस्तित्त्वात असलेली ही कला त्यानंतरच्या काळात हळूहळू लुप्त झाली. आपण भाग्यवान आहोत, कारण त्या कलेचा एक ठळक पुरावा अजूनही आपल्या शहरात अस्तित्त्वात आहे. आता आपल्याकडे ब्रह्मदेवाची पूजा केली जात नाही. मात्र हजार वर्षांपूर्वी ती केली जात होती. नालासोपारा, ठाणे इथे सापडलेल्या ब्रह्मदेवाच्या मूर्ती हा त्याचा पुरावा आहे. अंबरनाथच्या मंदिरातही ब्रह्मदेवाची मूर्ती आहे. पूर्वीच्या काळी सती जाणाऱ्या महिलांच्या स्मृत्यर्थ सतीशिळा उभारीत. युद्धात वीरमरण आलेल्या सैनिकांची आठवण म्हणून ‘वीरगळ’ उभारत. सती शिळा आणि वीरगळ अशा या दोन्ही प्रकारच्या शिळा अंबरनाथच्या मंदिर परिसरात पहायला मिळतात.
या शिव मंदिराची काही जुनी छायाचित्रे उपलब्ध आहेत. त्यावरून अगदी १९५० च्या दशकापर्यंत हे मंदिर बऱ्या पैकी अस्तित्त्वात होते, असे पुराव्यानिशी म्हणता येते. पहिल्या भारतीय वृत्तपत्र छायाचित्रकार होमाई व्यारावाला यांनी शिवमंदिर परिसरात वालधुनी नदीचे टिपलेले एका सहलीचे छायाचित्र उपलब्ध आहे. मंदिरालगत वाहणारी वालधुनी नदीसुद्धा शुद्ध होती, हे त्या छायाचित्रावरून दिसून येते असे त्यांनी स्पष्ट केले. साधारण १९६० नंतर वाढती लोकसंख्या, त्यामुळे वाढलेले वायू, जल आणि ध्वनी प्रदुषण या कारणांमुळे मंदिर परिसरातील शांतता, सौदर्य आणि स्वच्छतेला ग्रहण लागले, असे म्हणता येईल. म्हणजे नैसर्गिक आपत्ती आणि परकीयांची आक्रमणे यापासून नऊ शतके अबाधित राहिलेल्या या वास्तूची नंतरच्या पन्नासेक वर्षात अधिक हानी झाली, असे खेदाने नमूद करावेसे वाटते.
हे शिवमंदिर बांधण्याचा हेतू काय हे अभ्यास करण्याची आवश्यकता आहे. हे मंदिर शैव सिद्धांताचे मंदिर आहे. प्रत्येक मंदिर बांधण्यामागे वेगवेगळे कारण असते, हेतू वेगळा असतो. हे मंदिर बांधले त्याकाळात सर्वसामान्य माणसांना मंदिरात प्रवेश नसायचा आणि माणसं निरक्षर होती. त्यांना जे काही ज्ञान, तत्वज्ञान शिकवण्यासाठी मंदिराच्या बाह्य भागात शिल्पकलेने म्हणजे चित्रांवरून अभ्यास करता यावा हा हेतू असावा असे डॉ. कुमुद कानिटकर यांनी सांगितले. या मंदिरात जातांना बाहेरच्या भागाचा अभ्यास करून गेल्यास आत गर्भगृहात दर्शन घेताना समाधान मिळते असेही त्यांनी सांगितले. या मंदिराच्या बाह्य भागावरील ज्या मूर्ती आहेत त्या पूजनासाठी नसून मननासाठी आहेत. त्यांचे मनन करायचे असे डॉ. कुमुद कानिटकर यांनी सांगितले. अकराव्या शतकात मोक्षाप्रत जाण्याचा मार्ग कोणालाही शिकता यावा म्हणून ही शिल्पकला केलेली असावी असे त्या म्हणतात. या शिवमंदिराच्या बाह्य भागातील ज्या काही मूर्ती सध्या दिसत नाहीत त्या प्रदूषणामुळे गळाल्या असाव्यात असा निष्कर्ष काढता येईल. कारण पाषाणाच्या मूर्ती चोरून नेण्याचा प्रकार आपल्याकडे नाही असेही डॉ. कुमुद कानिटकर यांनी सांगितले.
गेल्या चार दशकात कळत, नकळतपणे या प्राचीन ठेव्याची बरीच हानी झाली आहे. आता शासन आणि प्रशासन ती चूक दुरूस्त करण्याचा प्रयत्न करीत आहेत. अलीकडे या शिवमंदिराच्या परिसरात तशी सुधारणा केलेली दिसून येत आहे. या शिवमंदिरालगत असलेल्या वालधुनी नदी आणि पुष्करणीला सुद्धा अनन्य साधारण महत्व आहे. प्राचीन संस्कृतीचा अतिशय महत्वाचा हा ठेवा पुढील अनेक पिढ्यांपर्यंत जपून ठेवण्यासाठी आपणही आपला खारीचा वाटा उचलायला हवा. केवळ सरकार करेल अशी भावना किंवा मानसिकता नसावी. केवळ महाशिवरात्रीला किंवा श्रावण महिन्यात जाऊन आपली जबाबदारी संपत नाही तर आता या अतिशय महत्वाच्या असलेल्या या प्राचीन शिव मंदिराची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे.
संसदरत्न खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी गेल्या दहा वर्षात शिवमंदिर कला महोत्सव आणि अन्य उपक्रमाद्वारे या शिवमंदिराची महती आणि माहिती जगभरात व्हावी यासाठी यशस्वी प्रयत्न केले. त्यामुळे आता या शिवमंदिरात बारा महिने शिवभक्त आणि पर्यटक येऊ लागले आहेत.
*वाढत्या अपेक्षा*
९६४ वर्षे हे अतिशय प्राचीन शिवमंदिर आहे. या ठिकाणी येणाऱ्या भविकांप्रमाणेच पर्यटक व वास्तू कलेचे अभ्यासक यांचे प्रमाण लक्षणीयरीत्या वाढलेले आहे. या सर्व पार्श्वभूमीवर या शिवमंदिरात व आसपासच्या परिसरात अनेक सुविधा उपलब्ध करणे अत्यावश्यक आहे. ज्यात चांगले स्वच्छ असे स्वच्छता गृह, चांगल्या दर्जाचे किमान उपहार गृह, वाहन तळ आदी मूळ पायाभूत सुविधा तातडीने उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. या शिवमंदिराची अधिकृत माहिती छायाचित्रांसह दाखवता येईल असे स्लाईड शो ची व्यवस्था असलेले म्युझियम उभारण्यात यावे. या मध्ये शिवमंदिराचे भग्नावशेष, जे पुरातत्व खात्याने जतन करून ठेवले आहेत ते सुद्धा या म्युझियम मध्ये ठेवता येतील.
या शिवमंदिर आणि परिसराचा पर्यटनाच्या दृष्टीने विकास करता येऊ शकतो. त्या साठी तज्ञ व्यक्ती व संस्था पुढे येण्यास तयार आहेत. पुरातत्व खात्याने शिवमंदिराच्या परिसरात अलीकडे चांगली सुधारणा केली आहे.
किसन कथोरे हे अंबरनाथ विधानसभेचे आमदार असतांना महाराष्ट्र शासनाने तीर्थक्षेत्र विकास योजनेत याचा समावेश केला असून पहिल्या टप्प्यातील अडीच कोटी रुपयांची विकास कामे झाली आहेत. त्यात वालधुनी नदी काठी संरक्षक भिंत बांधली आहे. घाट बांधला आहे. भव्य स्वागत कमान उभारण्यात आली आहे. वाहनतळाची जागा करण्यात आली आहे. सध्या अस्तित्वात असलेले लहान पूल पाडून भव्य प्रशस्त पादचारी पूल बांधणे, सध्या असलेली लहान दुकाने हटवून त्यांना चांगली नियोजन करून सुशोभित अशी दुकाने बांधणे, लहान मोठी उद्यान उभारणे, वाहनतळ उभारणे अशी विविध विकास कामे प्रस्तावित आहेत.
डॉ. श्रीकांत शिंदे हे खासदार झाल्यानंतर त्यांनी या शिवमंदिराचा परिसर सुशोभित करण्यासाठी तसेच या शिवमंदिराची महती जगभरात पोहोचावी या साठी अनेक उपक्रम आणि योजना हाती घेतल्या आहेत. शिवमंदिर परिसर सुशोभीकरणसाठीचा सुमारे दीडशे कोटी रुपयांचा विकास आराखडा मंजूर करण्यात आला आहे. हा आरखडा तयार करण्यासाठी देशभरातील अनेक स्थळांचा अभ्यास करण्यात आला आहे. प्रत्यक्ष कामाला सुरुवात करण्यात आली आहे. त्यासाठी तज्ज्ञ अभ्यासकांची टीम कार्यरत आहे. येत्या काही वर्षांत प्राचीन शिवमंदिर परिसराचा कायापालट होईल अशी अपेक्षा आहे.
या सर्व आराखड्यात मंदिराकडे जाणारे मार्ग प्रशस्त करणे, कमानी उभारणे, मंदिराची माहिती मिळेल अशी वास्तू आणि त्यात अत्याधुनिक यंत्रणेचा वापर करून हे दालन विकसित करण्यात येणार आहे. वालधुनी नदी पुनरुज्जीवित करणे, भव्य वाहन तळ, प्रशस्त स्वच्छता गृह उभारणे, उद्यान आदी अनेक योजनांचा यात समावेश आहे.
अंबरनाथ शहरात असलेल्या या प्राचीन शिवमंदिराची प्रतिकृती रेल्वे स्थानकावर करण्याचा सुद्धा आराखडा तयार करण्यात येत आहे. अंबरनाथ रेल्वे स्थानकावर आल्यावर वेगळे वातारण तयार होईल असे हे स्थानक करण्याचा प्रयत्न आहे. रस्ता मार्गाने येतानाही शहरात प्रवेश करतानाच्या प्रत्येक चौकातही वेगळे नियोजन करण्यात आले आहे. अंबरनाथ शहरात कुठूनही प्रवेश करताना येणाऱ्यांचे मन प्रसन्न होईल यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे.
एक महत्वाची सूचना या निमित्ताने करावीशी वाटते, या प्राचीन शिवमंदिरात पुरातत्व खात्याने दूध व अन्य पदार्थ अर्पण करण्यास बंदी घातली आहे. मात्र या सूचनेकडे दुर्लक्ष होत असल्याचे प्रकर्षाने जाणवते. या शिवमंदिराची एक सर्वसामावेशक ट्रस्ट ची स्थापना करण्यात यावी. ज्यात शिवमंदिराचे पारंपरिक पुजाऱ्यांपैकी काही सदस्य, लोकप्रतिनिधी, शासकीय अधिकारी आणि शहरातील काही प्रतिष्ठित नागरिक यांचा समावेश असलेलं हे ट्रस्ट असावे. जेणे करून या शिवमंदिराची नित्यनेमाने देखभाल करण्यात येईल. येणाऱ्या भाविकांना योग्य मार्गदर्शन आणि सुविधा मिळू शकतील. सध्या या मंदिरात कोणतीही शिस्त हवी त्या प्रमाणात मिळते असे नाही. या शिवमंदिरात श्रद्धाळू प्रचंड मोठ्या संख्येने येत असतात. गेल्या दशकात संख्या वाढतच आहे. पूर्वी ठराविक कालावधी मध्ये म्हणजे श्रावण महिना, महाशिवरात्री या निमित्ताने भाविक येत असत. आता वर्षाचे बाराही महिने भाविक येत असतात. अन्य मंदिरांमध्ये अभिषेक करण्याची सुविधा मंदिराच्या विश्वस्तांतर्फे करण्यात येते. भाविकांनी आपल्या इच्छे प्रमाणे पावती फाडली की त्यांनी सांगितलेल्यांच्या नावे मंदिरात अभिषेक, पूजा, होम हवन, अन्नदान आदी केले जात असतात. या शिवमंदिरात तशी कोणतीही सुविधा अधिकृतपणे उपलब्ध नाही. ट्रस्ट स्थापन केल्यास तशी सुविधा मिळून शिस्त लागल्याने मंदिराचे उत्पन्न कैक पटीने वाढून भाविकांची सोय होऊ शकेल. काही वर्षांपूर्वी उपविभागीय अधिकारी असलेले संदीप आरोटे यांनी या शिवमंदिराच्या पारंपरिक पुजाऱ्यांची एकत्र बैठक घेऊन तसा प्रयत्न केला होता. मात्र त्यांची बदली झाल्यावर तो विषय तिथेच थांबला.
देशातील आणि जगभरातील पर्यटन केंद्रावर किंवा धार्मिक स्थळांवर गेल्यावर पर्यटकांना त्या स्थळाची आठवण रहावी म्हणून विविध वस्तू जसे की टी शर्ट, पिशव्या, वेगवेगळ्या प्रकारचे स्टिकर्स उपलब्ध असतात. त्याप्रमाणेच या शिवमंदिराच्या ऐतिहासिक वास्तूचे उल्लेख असलेल्या वस्तू विक्रीस ठेवल्या तर येणाऱ्या पर्यटकांना तशा वस्तू मिळतील आणि अंबरनाथ आणि आसपासच्या बेरोजगारांना रोजगार उपलब्ध होऊ शकेल. येणाऱ्या पर्यटकांना तशा वस्तू हव्या असतात. मात्र या ठिकाणी तशी सुविधा नाही.
शिवमंदिर हा विषय अतिशय जिव्हाळ्याचा विषय असल्याने लिहू तितके कमीच आहे. या शिवमंदिराची माहिती असलेल्या आहुतिच्या दोन आवृत्या प्रसिद्ध केल्या आहेत. तिसरी प्रकाशित करण्याचा मानस आहे. यांचे कारण म्हणजे या ऐतिहासिक वास्तूची नागरिकांना माहिती मिळायला पाहिजे. अधिकृत माहिती मिळणे कमी असल्याने मग चुकीची आणि कपोलकल्पित माहिती नागरिकांना मिळत आहे. जसे की पांडवांनी एका रात्रीत हे मंदिर बांधले आहे, एका दगडात हे मंदिर बांधले आहे, हेमाडपंथी मंदिर आहे अशा एक ना अनेक चुकीच्या गोष्टी पसरल्या जात आहेत.
१९९० च्या दशकांपर्यंत या शिवमंदिराच्या जवळून वहाणारी वालधुनी नदी खळखळत वाहत होती. आता मात्र त्याला दुर्गंधीयुक्त नाल्याचे स्वरूप प्राप्त झाले आहे. वालधुनी नदीच्या उगमापासून शेवटापर्यंत शासनाने कडक कारवाई करून ही नदी दूषित करणाऱ्यांवर कठोर कारवाई करणे अपेक्षित आहे. नवीन प्रस्तावात वालधुनी नदी पुनरुज्जीवित करण्याचा प्रस्ताव आहे हे विशेष आहे. ही नदी रुंद आणि खोल करण्यासाठी प्रयत्न होणे अपेक्षित आहे.
असे किती तरी करता येण्यासारखे आहे. या शिवमंदिरासाठी आणि परिसराच्या विकासाठी केंद्र आणि राज्य शासनाने लक्ष घातले आहे. ट्रस्ट स्थापन झाल्यास हजारो भाविक मदतीसाठी पुढे येतील. अंबरनाथचे हे शिवमंदिर सर्वांचा सर्वार्थाने विकास करू शकते इतकी त्याची क्षमता आहे. यासाठी विद्यमान शिवभक्त संसद रत्न खासदार डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे यांनी पुढाकार घ्यावा ही कळकळीची विनंती. त्यांनी मनात आणले तर हे काम लगेच होऊ शकेल.
१४ ऑगस्ट रोजी या प्राचीन शिवमंदिराचा वर्धापन दिन येत आहे. त्यानिमित्ताने पुन्हा एकदा सर्वाना शुभेच्छा ! या शिवमंदिर आणि परिसर विकास प्रकल्प दिलेल्या मुदतीत पूर्ण होण्यासाठी, कोणतीही आडकाठी, अडथळा न येता पूर्ण व्हावा यासाठी शिवचरणी मनापासून प्रार्थना !