डासांच्या आळ्यांची उत्पत्ती; केडीएमसीकडून 12 बिल्डरांना नोटीसा
कल्याण डोंबिवली :नीतू विश्वकर्मा
पावसाळ्यात डासांच्या आळ्यांची उत्पत्ती मोठ्या प्रमाणात होत असल्याने डासांशी संबंधित आजार पसरण्याची भिती असते. या पार्श्वभूमीवर डासांच्या आळ्या आढळून आल्याने कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतर्फे तब्बल 12 बिल्डर आणि बांधकाम व्यावसायिकांना नोटीस बजावण्यात आली आहे. केडीएमसीच्या मुख्य स्वच्छता अधिकाऱ्यांकडून ही कारवाई करण्यात आली आहे.
पावसाळ्यात जलजन्य आजारांसह डासांमुळे होणाऱ्या आजारांचाही मोठा धोका असतो. ज्यामध्ये हिवताप, डेंग्यू, मेंदुज्वरसारख्या गंभीर आजारांचा समावेश आहे. पावसाळ्यात साचलेल्या पाण्यावर डासांची पैदास होत असल्याने कल्याण डोंबिवलीतील बांधकाम व्यावसायिकांनी आपापल्या बांधकाम ठिकाणांवर आवश्यक त्या प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याचे निर्देश दिले आहेत. त्या पार्श्वभूमीवर केडीएमसीचे मुख्य स्वच्छता अधिकारी वसंत देगलूरकर यां च्याकडून कल्याण डोंबिवलीत नव्याने सुरू असलेल्या बांधकाम ठिकाणांची पाहणी केली जात आहे. या पाहणीमध्ये तब्बल 12 नविन बांधकाम ठिकाणांवर साचलेल्या पाण्यामध्ये डासांच्या आळ्यांची उत्पत्ती झाल्याचे निदर्शनास आले.
त्यामुळे बी.आर. होमर्स,योगीराज शेळके,ओमकार, चिन्मय पाटील,राजेंद्र परांजपे, रवी, शुभंकर सो.श्रीकृष्ण मराठे, सौरभ उगावडे, संदीप गुडे, अभय कामत, सचिन कटके आणि नीलपद्म डेव्हलपर्स या बांधकाम व्यावसायिकांना नोटीस बजावण्यात आल्याची माहिती केडीएमसी मुख्य स्वच्छता अधिकारी वसंत देगलूरकर यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली आहे.