“व्यापाऱ्यांना विश्वासात घेऊनच कल्याणातील स्मार्ट सिटीची विकासकामे करा” – व्यापारी फेडरेशनची आग्रही मागणी.

कल्याण : नीतू विश्वकर्मा
कल्याणातील व्यापाऱ्यांनी शासकीय प्रकल्पांमध्ये यापूर्वीच भरपूर काही भोगले असल्याचे सांगत विविध विकासकामांबाबत इथल्या व्यापाऱ्यांना विश्वासात घेणे गरजेचे आहे. त्यामुळे स्मार्ट सिटीच्या यापुढील सर्व विकासकामांमध्ये व्यापाऱ्यांना विश्वासात घेण्याची आग्रही भूमिका व्यापारी फेडरेशनतर्फे मांडण्यात आली आहे. कल्याण पश्चिमेतील स्वामी नारायण हॉलमध्ये व्यापाऱ्यांची बैठक झालेल्या महत्त्वाच्या बैठकीत ही भूमिका मांडण्यात आली.
केडीएमसी मुख्यालयापासून हाकेच्या अंतरावर असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज चौक ते मोहम्मद अली चौक ते महात्मा फुले चौक या मार्गावर गेल्या 20 वर्षांत दोन वेळा रस्ता रुंदीकरण झाले आहे. त्यामध्ये अनेक व्यापाऱ्यांची दुकाने बाधित झाली असून व्यापारी वर्गाला केडीएमसी प्रशासनाकडून त्याबाबत अद्याप कोणतीही नुकसान भरपाई मिळालेली नाहीये. हे ही कमी होते म्हणून की काय आता आम्हा सर्व व्यापाऱ्यांना विश्वासात न घेता या भागातून कल्याण मेट्रो नेण्याची तयारी केली जात असल्याची आम्हाला शंका आहे. या शंकेचे निरसन करण्यासाठी आम्ही शासनाच्या संबंधित विभगांसह केडीएमसी प्रशासनाशी याबाबत पत्रव्यवहार केला आहे. परंतु त्यानंतरही त्यांच्याकडून यासंदर्भात कोणतीही ठोस माहिती आम्हाला मिळत नाहीये. आमचा स्मार्ट सिटीला किंवा त्याअंतर्गत होणाऱ्या सॅटीस प्रकल्प, कल्याण मेट्रो आदीना अजिबात विरोध नाहीये, परंतू या सर्व प्रकल्पांसाठी शासनाने आम्हाला पुन्हा विस्थापित करू नये अशी आमची भूमिका असल्याचे व्यापारी संघटनेचे अध्यक्ष हरीश खंडेलवाल यांनी सांगितले.
तर या शहराचे मूळ रहिवासी असणाऱ्या जुन्या व्यापाऱ्यांना उद्ध्वस्त करून नव्याने आलेल्या – येणाऱ्या लोकांसाठी विकास प्रकल्प आणण्यामध्ये शासनाचा नेमका कोणता विचार आहे? त्यामुळे कल्याणात येणारी ही मेट्रो दुर्गाडी – गोविंदवाडी बायपासमार्गे एपीएमसीला ही मेट्रो नेण्यात यावी असे किरण चौधरी यांनी यावेळी सांगितले.
तर जागरूक नागरिक आणि माहिती अधिकार कार्यकर्ते श्रीनिवास घाणेकर यांनी सांगितले की या मेट्रोचा डी पी आर कल्याणातील व्यापाऱ्यांना विश्वासात घेऊनच बनवला गेला पाहिजे. तसे झाले नाही तर आम्ही या प्रकल्पाविरोधात कोर्टामध्ये लढाई सुरू करू अशी प्रतिक्रिया घाणेकर यांनी यावेळी दिली आहे.