विसर्जनाची उल्हासनगर मनपाची जय्यत तयारी.

उल्हासनगर : नीतू विश्वकर्मा
गणेश उत्सव असल्याने उल्हासनगर शहरातील आयडिया कंपनी, सेंच्युरी, हिराघाट, उल्हासनगर रेल्वे स्टेशन, लालचक्की, नाना-नानी पार्क, कैलास कॉलनी येथील श्री गणेशमुर्ती विसर्जन घाटांवर मनपाने दरवर्षीप्रमाणेच जय्यत तयारी केली आहे.
शहरात सुमारे 5 ते 6 फुटांपर्यंतच्या गणेशमूर्तींचे विसर्जन वरील नमूद घाटांवर केले जाते. उंच मूर्तींचे विसर्जन कल्याणच्या खाडीत केले जाते.
लोकांना भक्तीभावाने गणरायाला निरोप देण्यासाठी महानगरपालिकेने सर्व विसर्जन घाटावर गणेश भक्तांची उत्तम सोय केलेली आहे. विसर्जना आधी पूजाअर्चा करण्यासाठी टेबलांची व्यवस्था केली आहे. निर्माल्य संकलनासाठी कलश ठेवण्यात आले आहेत. याप्रसंगी कुठलीही आपत्ती निर्माण होऊ नये यासाठी अग्निशमन यंत्रणा, सुरक्षा रक्षक व वैद्यकीय पथक तैनात केले आहे.
आयुक्त विकास ढाकणे यांच्या मार्गदर्शनाखाली अतिरिक्त आयुक्त जमीर लेंगरेकर, किशोर गवस व उपायुक्त सुभाष जाधव यांच्या नियंत्रणाखाली सर्व प्रभागा अधिकारी व सर्व स्वच्छता निरीक्षक व अग्निशमन विभाग प्रमुख वैयक्तिक लक्ष देऊन विसर्जनाचे कामकाज सुरळीत पार पाडत आहेत.
शहरातील सर्व विसर्जन घाटावर चोख व्यवस्था ठेवण्याचे निर्देश संबंधित अधिकारी कर्मचारी यांना आयुक्तांनी दिले आहेत. त्या अनुषंगाने गणेशोत्सवापूर्वी शहरात पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करणेबाबत महापालिकेमार्फत आवाहन करण्यात आले असून त्याप्रमाणे बहुतांश नागरिकांनी शाडूमातीच्या गणेशमुर्तींची स्थापन करून महापालिकेच्या या आवाहनास उस्फुर्त प्रतिसाद देण्यात येत आहे.
मागील वर्षी वरील विविध ठिकाणी एकूण 13,806 गणेशमुर्तींचे विसर्जन करण्यात आले होते. यावर्षी देखील मागील वर्षा इतक्याच गणेशमूर्ती विसर्जनसाठी येण्याची शक्यता आहे.
विसर्जन घाटाच्या ठिकाणी गणेश चतुर्थीपासून साफ-सफाई, सुरक्षा यंत्रणा, जेवण/नास्ता, चहा-पाणी यांची व्यवस्था चोख ठेवण्याचे निर्देश महापालिका आयुक्तांनी संबंधित विभागास दिले होते. त्यान्वये सार्वजनिक आरोग्य विभाग, अग्निशमन विभाग व भांडार विभागामार्फत साफ-सफाई, सुरक्षा यंत्रणा, जेवण/नास्ता, चहा-पाणी यांची व्यवस्था विसर्जन घाटावर योग्य प्रकारे करण्यात आली आहे.