हद्दीच्या वादात रखडला रस्त्याचा विकास ; प्रहार व राष्ट्र कल्याण पार्टी ने आंदोलन करुन विचारला बेपर्वा प्रशासनाला जाब.
उल्हासनगर : नीतू विश्वकर्मा
व्हीटीसी मैदान ते व्हिनस मार्गे आशेळे, मानेरे गावांकडे जाणाऱ्या रस्त्याची गेल्या १६ वर्षांपासून मोठी दुरवस्था झाली आहे.रस्त्याची अवस्था पाहिल्यास रस्त्यावर खड्डे आहेत की खड्ड्यात रस्ता, असा प्रश्न उपस्थित होतो.दाट लोकवस्ती असलेल्या या भागातून पादचारी आणि वाहनांची मोठी वर्दळ असते.गेल्या अनेक वर्षांपासून दर पावसाळ्यात या रस्त्याची चाळण होते.या एक ते सव्वा किलोमीटर अंतराच्या रस्त्यासाठी निधी मंजूर असल्याचे स्थानिक सांगत आहेत.मात्र नागरिकांचे हाल होत असतानाही स्थानिक लोकप्रतिनिधी आणि महापालिका प्रशासन या रस्त्याच्या दुरुस्तीबाबत उदासीन असल्याचे दिसून येते.
व्हीटीसी मैदान ते व्हिनस मार्गे आशेळे, मानेरे गावांकडे जाणारा हा रस्ता आपल्या हद्दीत येत नसल्याचे उल्हासनगर महानगरपालिका आणि कल्याण – डोंबिवली महानगरपालिकेचे म्हणणे आहे.आणि या हद्दीच्या वादामुळेच दोन्ही महानगरपालिका या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी उदासीनता दाखवत असल्याचे दिसून येते.पावसामुळे खड्डे पडलेले रस्ते, त्यांची हद्द आणि कोणत्या विभागांच्या अंतर्गत आहे हे न पाहता तत्काळ दुरुस्त करण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मागच्या वर्षी सर्वच शासकीय यंत्रणांना दिले होते.मात्र उल्हासनगर आणि कल्याण -डोंबिवली या दोन्ही महानगरपालिकांनी मुख्यमंत्र्यांच्या आदेशाकडे दुर्लक्ष केल्याने आजही या रस्त्याच्या दुरुस्तीची समस्या दूर होऊ शकली नाही.
उल्हासनगर आणि कल्याण – डोंबिवली या दोन्ही महानगरपालिकांच्या वादाचा नाहक त्रास नागरिकांना होत असल्याने याविरुद्ध प्रहार पक्षाच्या वतीने आज हद्दीच्या वादात रखडलेल्या व्हीटीसी मैदान ते व्हिनस मार्गे आशेळे, मानेरे गावांकडे जाणाऱ्या रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यात बसून ठिय्या आंदोलन करण्यात आले.यावेळी प्रहार जनशक्ती पक्षाचे ठाणे जिल्हा अध्यक्ष स्वप्नील पाटील, उल्हासनगर शहर अध्यक्ष प्रधान पाटील आणि इतर कार्यकर्ते तसेच राष्ट्र कल्याण पार्टीचे अध्यक्ष शैलेश तिवारी यांनी जोरदार घोषणाबाजी करुन दोन्ही बेपर्वा महानगरपालिका प्रशासनाचा निषेध केला.कल्याण पूर्व विधानसभेचे आमदार गणपत गायकवाड यांनी देखील उपस्थित राहून प्रहारच्या या आंदोलनाला आपला पाठिंबा दिला आह
प्रहारच्या या आंदोलनाची दखल घेऊन प्रशासनाकडून या रस्त्याची तात्काळ दुरुस्ती करण्यात आली नाही तर त्याचे गंभीर परिणाम प्रशासनाला भोगावे लागतील असा इशारा स्वप्नील पाटील यांनी दिला.गेल्या काही दिवसापासून उल्हासनगर शहरातील नागरि आणि प्रशासकीय समस्येबाबत प्रहार पक्ष आक्रमक भूमिका घेताना दिसून येत असून प्रहार पक्षाचे ठाणे जिल्हा अध्यक्ष स्वप्नील पाटील यांच्या नेतृत्वाखाली पक्षाची यशस्वी घोडदौड सुरु आहे.