उल्हासनगर काँग्रेसची माजी नगर रचनाकारांच्या कारकिर्दीत मंजूर बांधकाम परवान्यांबाबत सखोल चौकशीची मागणी.
उल्हासनगर:नीतू विश्वकर्मा
उल्हासनगर काँग्रेसच्या शिष्टमंडळाने आज उल्हासनगर महानगरपालिकेचे आयुक्त श्री. विकास ढाकणे यांची भेट घेतली आणि माजी नगर रचनाकार श्री. प्रकाश मुळे यांच्या कार्यकाळात मंजूर केलेल्या बांधकाम परवान्यांमध्ये आढळलेल्या अनियमित बाबींवर सखोल चौकशी करण्याची मागणी केली. शिष्टमंडळाने आयुक्तांना दिलेल्या निवेदनात विविध बांधकाम परवान्यांमध्ये नियमांचे उल्लंघन आढळले असल्याचे नमूद केले आहे.
विशेषतः, अनेक प्रकरणांमध्ये डी.पी. रोडवर किंवा अनुमतीपेक्षा जास्त एफ.एस.आय. देऊन अनधिकृत बांधकामास परवानगी दिल्याचे उघड झाले आहे. तसेच, काही जुनी इमारती ज्यांमध्ये आधीच उल्लंघन व अनधिकृत बांधकाम आहे, त्यांना ऑक्युपन्सी सर्टिफिकेट (ओ.सी.) दिले गेल्याचे सांगण्यात आले आहे. या अनियमिततेमुळे उल्हासनगर शहरातील नागरिकांना पूर्वीही धोका झाल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
निवेदनात असेही नमूद केले आहे की, भविष्यात या नव्या इमारतींमध्ये घर खरेदी करणाऱ्या ग्राहकांना फसवणुकीचा धोका निर्माण होऊ शकतो. नागरिकांच्या हक्कांच्या सुरक्षिततेसाठी आणि त्यांच्या कष्टाच्या पैशाचे संरक्षण करण्यासाठी सर्व बांधकाम परवान्यांची आणि संबंधित प्लॅन्सची सखोल चौकशी करून ऑडिट करण्याची विनंती शिष्टमंडळाने केली आहे.
ज्याठिकाणी नियमबाह्य परवानगी देण्यात आली आहे, तिथे तात्काळ स्थगिती आदेश लागू करून संबंधित बांधकाम व्यावसायिक आणि आर्किटेक्टवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणीही करण्यात आली आहे. शिष्टमंडळाच्या मते, अशाप्रकारे कारवाई केल्यास झलक बिल्डिंग सारख्या प्रकरणांत नागरिकांची फसवणूक होण्यापासून रोखता येईल.
आयुक्तांनी या विषयावर गांभीर्याने विचार करणार असल्याचे आश्वासन दिले. निवेदन देताना काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रोहित साळवे, ब्लॉक अध्यक्ष किशोर धडके, महासचिव कुलदीप ऐलसिंघानी, अनुसूचित जाती विभागाचे अध्यक्ष शैलेंद्र रुपेकर उपस्थित होते.