उल्हासनगर शहरात ऑनलाईन लॉटरीच्या नावाखाली शासनाचा लाखोंचा महसूल होतोय गुल.
उल्हासनगर : नीतू विश्वकर्मा
उल्हासनगर शहरात विविध भागात ऑनलाईन लॉटरीच्या नावाखाली शासनाचा लाखोंचा महसूल बुडवला जात असल्याचे चित्र सगळीकडे पाहायला मिळत आहे. कोणत्याही प्रकारची जीएसटी व टॅक्स न भरता चालू असलेला हा अवैध लॉटरी व्यवसाय तात्काळ बंद करण्यात यावा, अशी मागणी सुजाण नागरीकातून होत आहे. त्यामुळं;ए शासनाचा लाखो रुपयांचा महसूल अक्षरशः गुल होत असल्याचे दृष्टीपथास येत आहे.
उल्हासनगर शहरात अनेक भागात अवैध लॉटरीची ही ऑनलाईन दुकानदारी चालू आहे. या धंद्यात लॉटरीची ऑनलाईन तिकिटे विकणे, त्यांचा निकाल लावणे अशी कामे हा व्यवसाय चालवणारे करतात. म्हणजेच ज्या दुकानात तिकीट घेतले जाते, त्याच दुकानात लॉटरीचा निकाल लावणाऱ्याही मशीन उपलब्ध असल्याचे सांगण्यात येते. अशा प्रकारची लॉटरी खेळणाऱ्या वर्गात बहुतांश हॉटेलमध्ये काम करणारा कर्मचारी वर्ग, रिक्षाचालक, बिगारी काम करणारे लोक असतात. म्हणजेच थोडक्यात ऑनलाईन लॉटरीच्या नावाखाली हा एक जुगाराचा प्रकारच उल्हासनगर शहरात खुलेआमपणे सुरु आहे. कोणताही व्यवसाय म्हटले की, शासनाला त्यातून महसुली उत्पन्न व्हायलाच हवे. मात्र या ऑनलाईन लॉटरीच्या धंद्यात कोणत्याही प्रकारचा महसूल शासनाच्या तिजोरीत जमा होताना दिसत नाही. असे असताना अशी दुकाने चालवण्याची परवानगी देण्यात येतेच कशी ? असे एक ना अनेक प्रश्न उपस्थित होताना दिसत आहेत. अशा प्रकारची संपूर्ण उल्हासनगर शहरात किमान १२ ते १५ दुकाने असल्याचे सांगण्यात येते. म्हणजेच या माध्यमातून दररोज लाखो रुपयांचा महसूल गुल होत आहे.
ऑनलाईन लॉटरीच्या नावाखाली चालू असलेला जुगार कोणाच्या ना कोणाच्या आशीर्वादानेच चालत असणार आहे, हे वेगळे सांगण्याची गरज नाही. या आशिर्वादापोटी हा धंदा चालवणारे लोक महिन्याला खालपासून ते वरपर्यंत किमान लाखांचा मलिदा वाटप करत असल्याचीही चर्चा आहे. आता हा मलिदा नक्की कोणा – कोणाच्या घशात जातोय ? याबद्दलही सामान्यांना उत्सुकता आहे.